सातारा (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०३.०१.२०२०
सातारा- महिला व बालकांच्या बाबतीत दाखल होणा-या तक्रारीपैकी ७० टक्के तक्रारी या सायबरच्या माध्यमातून महिला अत्याचारांच्या असून महिला व युवतींनी याला बळी न पडण्यासाठी सदैव दक्षच राहिले पाहिजे, असे आवाहन सातारा पोलीस दलाच्या सायबर विभागाचे सहायक पोलीस निरिक्षक गजानन कदम यांनी केले. सातारा येथील अलंकार हॉलमध्ये सातारा जिल्हा पोलीस दल व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व बालकांच्याबाबतीत सोशल मिडीयाच्या वाढत्या गुन्हृयांच्यादृष्टीने ‘सायबर सेफ वुमेन’ या विषयावर जाणिव जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या अर्चना देशमुख, आझाद महाविद्यालयाच्या उप प्राचार्य एस.एम. शिकलगार, सामाजिक कार्यकर्ते समृध्दी जाधव, सुवर्णादेवी पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी सुरुवात झालेल्या सायबर सेफ वुमन या मोहिमेत सहभागी होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तसेच विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी जनतेला केलेल्या आवाहनाची चित्रफित दाखविण्यात आली. यावेळी सहायक पोलीस निरिक्षक गजानन कदम म्हणाले, इंटरनेटच्या माध्यमाने मानवी जीवन सुलभ झाले असले तरी सोशल मिडीयाच्या वाढत्या प्रभावातून बळावलेल्या विकृतीला मानवी जीवन आहारी जात आहे. त्याविषयी असलेल्या अपुऱ्या माहितीने ते धोकादायक झाले आहे. यासाठी सर्व महिलाबरोंबरच अजाण बालकांसाठी सायबर साक्षरता ही एक महत्वाची बाब आहे. सायबर गुन्हे हे असे गुन्हे आहेत ज्यात संगणक, इंटरनेट किंवा मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर करून वैयक्तिक पातळीवर अवैध कृत्य केले जाते. सायबर गुन्हे करण्यासाठी सोशल नेटवर्किंग साइट्स, ई-मेल, चॅटरूम, पायरेटेड सॉफ्टवेअर, वेबसाइट इत्यादी सारख्या प्लॅटफॉर्मंचा वापर केला जातो. सायबरच्या माध्यमातून घडणाऱ्या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी सातारा पोलीस दलाचा सायबर विभाग नेहमीच तत्पर आहे. असे असले तरी महिलांनी आपली सुरक्षितता ओळखून इंटरनेट व मोबाईल्सच्या माध्यमातून होणाऱ्या अत्याचार व फसवणूकीपासून सावधान राहीले पाहीजे. तसेच पालकांनीही आपल्या मुलांना गुन्हा घडण्याच्यापूर्वी त्यांना या धोक्यापासून दुर ठेवले पाहीजे, असे मत त्यावेळी श्री.कदम यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या अर्चना देशमुख, आझाद महाविद्यालयाच्या उप प्राचार्य एस.एम. शिकलगार, सामाजिक कार्यकर्ते समृध्दी जाधव यांनी महिला सुरक्षेच्या दृष्टीने समुचित मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक पोलीस नाईक अजय जाधव यांनी केले. यावेळी यशवंतराव चव्हाण इन्स्टीट्युट ऑफ सायन्स, केबीपी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन, अण्णासाहेब कल्याणी महाविद्यालय यांचे शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात ही ‘सायबर सेफ वुमन’ जनजागृती धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात श्री. कदम म्हणाले, महिला व विद्यार्थींनींनी आपली वैयक्तिक माहिती अथवा फोटो कधीही सोशल मिडीयावर शेअर करु नये, विद्यार्थींनींनी विद्यार्थी जीवनात मोबाईल गरजेचा आहे का हे तपासून पहावे, ॲण्ड्राईड मोबाईल फोन वापरताना दैनंदिन जीवनात इंटरनेटशी येणारा संबध व त्यातून कळत नकळत घडणाऱ्या सायबर गुन्ह्यांच्या प्रकारांची उदाहरणे देऊन यापासून कसा बचाव करता यईल याबाबत माहिती दिली. तसेच सायबर सेफ वुमन ही एक सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी मोहिम असून यात सर्वांनी सहभागी व्हावे, कोणालाही काही अडचण आल्यास किंवा तक्रार नोंदवण्यासाठी महाराष्ट्र सायबरच्या www.reportphishing.in व https://cybercrime.gov.in तसेच महिला आणि बालकांसाठी सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी करीता 155260 या टोल फ्री कमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील सिनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा.डॉ. एल.एन.घाटगे म्हणाले, सायबर सेफ वुमन या उपक्रमातून आमच्या महाविद्यालयाती विद्यार्थींनीनी खूप चांगली माहिती मिळाली, याबाबत त्यांनी शासनाचे आभार मानले. यावेळी ‘सायबर सेफ वुमन’ या मोहिमेद्वारे शासन करीत असलेल्या जनजागृतीचा आम्हाला निश्चीतच फायदा होईल, असे उपस्थित विद्यार्थींनीनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.आसावरी शिंदे यांनी तर आभार प्रा. डॉ. सुवर्णा कुरकुटे यांनी आभार मानले. यावेळी धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा. अरुण बावळेकर, सिनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. एल.एन.घाटगे, प्राचार्या डॉ. पी.एस.गायकवाड, प्रा.डॉ. सुवर्णा कुरकुटे, प्रा. आसावरी शिंदे व महाविद्यालयातील विद्यार्थींनी उपस्थित होत्या.



















