सातारा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क प्रतिनिधी)सुभाष जाधव
दि..१६.१०.१९
फलटण- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत भाऊ तुपकर यांनी पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे. आज, बुधवारी दुपारी साडेतीन वाजता संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत ते पक्षात पुन्हा प्रवेश करणार आहेत. तुपकर यांच्या या निर्णयामुळे स्वाभिमानीला पुन्हा उभारी मिळणार आहे.लोक घरी येऊन रडले, तुम्ही चळवळीत पाहिजे अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याने जनतेची कदर करून आपण हा निर्णय घेतला असल्याचे रविकांत तुपकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
महिन्याभरापूर्वी तुपकर यांनी कोणतेही कारण न देता स्वाभिमानी ला सोडचिठी दिली होती. तत्पूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी रयत क्रांती संघटनेत प्रवेश केला होता. परंतु काही दिवसातच पुन्हा त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना परत येण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयावर तुपकर यांना विचारले असता ते म्हणाले, मी चळवळीतील लढाऊ सैनिक आहे. संघटनेतून बाहेर पडल्यानंतर माझी घालमेल, घुसमट होत होती. गेली पंधरा दिवस अस्वस्थ होतो कार्यकर्त्यांचा चळवळीत राहण्याचा दबाव होता त्यामुळे त्यांच्या शब्दाला मान ठेवून मी पुन्हा चळवळीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले. तर, इथून पुढचे सर्व आयुष्य चळवळीला वाहून घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.



















