सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३०.०५.२०२०
महाबळेश्वर- महाराष्ट्राचे नंदनवन, निसर्गाला पडलेले सुंदर स्वप्न, महाराष्ट्राची अस्मिता, अभिमान, आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ अशी अनेक बिरुदावली असलेले थंड हवेचे शहर महाबळेश्वर सध्या नगरपालिकेच्या भ्रष्ट आणि भोंगळ कारभाराने चांगलेच गरम झाले आहे.
उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार महाबळेश्वर नगरपालिकेने शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एसटीपी प्लांटची निर्मिती केली खरी पण शहरातील दुषित सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारलेला एसटीपी म्हणजेच Sewage Treatment Plant हा केवळ उच्च न्यायालय,सरकारी यंत्रणा, हरित लवाद,शहरातील नागरिक यांची दिशाभुल करण्यासाठीच उभा केला आहे का असा प्रश्न एसटीपी प्लांट नं.२ ला भेट देण्यास गेलेल्या निर्भीड पत्रकारच्या टीमला पडला. कारण या एसटीपी प्लांटची निर्मिती ही बंधनकारक असल्यामुळे नगरपालिकेने केली असली तरी या प्लांट मध्ये कसल्याही प्रकारची पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया दूषित पाण्यावर होत नसुन हे पाणी “आहे त्याच स्थितीत” म्हणजे दूषित स्थितीतच नैसर्गिक स्रोतांमध्ये सोडण्याचे काम नगरपालिकेकडून बिनधास्तपणे होत आहे.सदर दूषित पाणी हे शुद्ध आहे असा विश्वास नागरिक ठेऊन पुढे या पाण्याचा शेतीसाठी,पिण्यासाठी, व अन्य कारणांसाठी उपयोग करत आहेत.तर जंगलांनी वेढलेल्या महाबळेश्वरमध्ये असलेले वन्यप्राणी देखील हे दुषित,घातक पाणी आपली तहान भागविण्यासाठी पित असल्याने मानव प्रजाती प्रमाणेच येथील वनसंपदा देखील धोक्यात आली आहे.
कोरोनाच्या संकटाने समस्त जगाला हादरवून सोडले असून हे संकट महाबळेश्वरच्या सीमेपर्यंत येऊन ठेपले आहे. या परिस्थितीमुळे भारतीयांना आरोग्याचे महत्व समजले असून एक कदम स्वच्छता की ओर असे म्हणत “स्वच्छ भारत अभियानाचा” डांगोरा पिटणारी महाबळेश्वर नगरपालिका महाबळेश्वर वासीयांच्या आरोग्यासाठी फारशी गंभीर नसून उदासीन असल्याचे चित्र आहे. महाबळेश्वर येथील सांडपाणी, दूषित पाणी हे प्रक्रिया न करता नैसर्गिक स्रोतांमध्ये सोडता येणार नसल्याने उच्च न्यालायच्या आदेशाने महाबळेश्वर पालिकेने एसटीपी प्लांटची निर्मिती केली खरी पण या प्लांटला भेट दिल्यानंतर निर्भीड पत्रकारच्या टीमला अनेक धक्कादायक खुलासे नजरेस आले असून शहरातील जमा करून प्रक्रिया करण्याच्या हेतूने एकत्रित आणलेले हे दूषित पाणी प्रक्रिया न करताच आहे त्याच परिस्थितीत म्हणजे दूषित स्वरूपातच नैसर्गिक स्रोतांमध्ये सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार या मुळे उजेडात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून एसटीपी प्लांट नं.२ हा पूर्णपणे बंद अशा अवस्थेत असुन नगरपालिकेकडून ज्या “Aqua Plus” या पुण्याच्या ठेकेदार कंपनीला हा एसटीपी प्लांट चालविण्याचा ठेका मिळाला आहे त्यास न चूकता नगरपालिका बिल अदा करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वास्तवात एसटीपी गेल्या दोन वर्षांपासून पूर्णपणे बंद असून कसलेही शुद्धीकरणास आवश्यक केमिकल,मीडिया,टेस्ट रिपोर्ट, लॅब असे कसलेही साधन या प्लांट वर उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. या एसटीपीला नगरपालिकेने कधी भेट दिली आहे का ? मुख्याधिकारी व संबंधित अधिकारी डोळे बंद करून या एसटीपीच्या ठेकेदाराला बिल अदा करतात का ? की या अधिकाऱ्यांचे आर्थिक लागेबांधे या ठेकेदाराशी असल्यानेच ही डोळेझाक जाणीवपूर्वक केली जाते का ? मुख्याधिकारी या आरोग्याच्या प्रश्नाबाबत गंभिर नाहीत का ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले असून.डोळे झाकण्यासाठी अनेक संबंधित बोक्यांना लाचरूपी तूप दिले जात असून याच तुपामुळे अनेक वाळलेले बोके जाडजूड झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. नगरपालिकेकडून दूषित पाणी ज्या नैसर्गिक स्रोतांमध्ये सोडले जात आहे त्याच ओढ्याचे पाणी पिल्याने काही वर्षांपूर्वी दोन नागरिकांना आजारी पडून जीव गमवावा लागल्याचा इतिहास असताना मुख्याधिकारी महाबळेश्वर हे नागरिकांचे अजून जीव गेल्यावरच जागे होणार का हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. तसेच या प्रकरणी हरित लवाद,वनखाते,जिल्हाधिकारी, राज्यसरकार लक्ष घालून कारवाई करणार का ? असा प्रश्न देखील नागरिक विचारत असून कोरोनाच्या संकटाचा आधार घेऊन भ्रष्टाचार करणाऱ्याना शासन करण्यासाठी या प्रकरणी राज्य शासनाने तातडीने उच्च स्तरीय चौकशी समिती नेमून संबंधीतांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.



















