सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी.
दि.०५.०६.२०२०
महाबळेश्वर- सदाहरित जंगल देशभरातून नामशेष होण्याच्या मार्गावर असताना महाराष्ट्राचा मुकुटमणी असलेल्या महाबळेश्वर मध्ये विपुल प्रमाणात सदाहरित वन पाहायला मिळते. परंतु गेल्या काही वर्षांपासून हे सदाहरित जंगल मानवी हस्तक्षेपामुळे धोक्यात आले आहे.अनेक पर्यावरण प्रेमींच्या रेट्यामुळे महाबळेश्वरच्या जंगलास राज्यशासनाने इकोसेन्सेटिव्ह झोन मध्ये समाविष्ट केले आहे.जंगलतोड करणाऱ्या विरोधात कडक कायद्यांची तरतूद करण्यात आली आहे.असे असताना देखील बाहेरून येणारे व जागा खरेदी करून बंगले बांधणारे धनिक अगदी निर्दयीपणे या संरक्षित झाडांची कत्तल करत आहेत.तर फेकलेल्या पैशांमुळे हे जंगलतोड करणारे धनिक कडक कायदेशीर करवाईपासून सहीसलामत आपला बचाव करत असल्याचे चित्र आहे.असेच काहीसे प्रकरण मौजे मेटतळे येथे घडले आहे.०४ जानेवारी २०२० या दिवशी आर्ची डिसुझा, पाटील, महाजन या धनिकांनी आपल्या प्रॉपर्टी मध्ये बेकायदेशीर पणे वनतोड केल्याबद्दल बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्यावतीने घटनास्थळाच्या फोटोसह तहसीलदार महाबळेश्वर, व वनखाते यांना लेखी तक्रार अर्ज देण्यात आला होता.अनेकवेळा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांनी स्वतः भेट देऊन या अर्जावर कारवाई करण्याची मागणी देखील केली होती.परंतु आजपर्यंत दुर्दैवाने या अर्जावर कसलीही कारवाई झाली नाही.वरील प्रकरणात दुर्लक्ष केल्यानेच आर्ची डिसोझाच्या समोर अगदी महाबळेश्वर महाड रस्त्याला लागूनच असलेल्या प्रॉपर्टी मध्ये देखील बेझुट जंगलतोड करण्यात आली आहे.ही जंगलतोड अतिशय निर्दयीपणे केली आहे.शेकडो झाडे तोडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लोकडाऊनचा फायदा घेत ही जंगलतोड झाली असल्याचे निदर्शनास येत आहे.पण अशा जंगलतोडीकडे तहसीलदार कार्यालय जाणीवपूर्वक का डोळेझाक करत आहे ? यात काही “अर्थ”पुर्ण कारण दडले आहे का ? की तहसीलदार यांना महाबळेश्वरच्या या वनसंपदेबाबत गांभीर्य नाही ? असाच प्रश्न जनतेला पडला असून आतातरी मेटतळे या गावात झालेल्या जंगलतोडीकडे तहसीलदार लक्ष देणार का ? की तहसीलदार कार्यालयाच्या उदासीनपणामुळे महाबळेश्वरचे भवितव्य असलेले हे जंगल इतिहासजमा होणार ? हा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.कालच्या नैसर्गिक वादळाने महाबळेश्वरच्या वनसंपदेची मोठ्या प्रमाणात हानी झाली असून वादळापूर्वी मानवाने केलेली ही हानी आधी कोरोनाचा फायदा घेऊन तर आता नैसर्गिक वादळाचा फायदा घेऊन तहसील प्रशासनाच्या वरदहस्ताने लपवली जाऊ नये अशीच काहीशी चर्चा जनतेतून होताना दिसत आहे.



















