मुंबई(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, मिलिंद राऊत
दि.२३.०९.२०२२
मुंबई- बॅनरबाजी करणारे, फोटो आणि बातमीसाठी काम करणारे, प्रसिद्धीसाठी केविलवाणी धडपड करणारे लोक कधीही कार्यकर्ता होऊ शकत नाही. दुःखी, पीडित, शोषित माणसं ज्यावेळी आपल्याकडे मदतीसाठी गाऱ्हाणं मांडतात, तेव्हा तात्काळ मदत करणारा – मदत मिळवून देणारा व्यक्ती हाच खरे मौलिक कार्य करत असतो. सरकारे कितीही बदलली तरी शासनाच्या गोरगरिबांसाठी असणाऱ्या मदतीच्या योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणाराच माणूस आदर्श कार्यकर्ता असतो, असे मत रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी व्यक्त केले.
रुग्ण हक्क परिषद मुंबई प्रदेश कार्यकर्त्यांच्या बैठकीत चव्हाण बोलत होते. अंधेरी पूर्व भागात अजय चॅरिटेबल ट्रस्ट कार्यालयामध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अजय तिवारी, रुग्ण हक्क परिषदेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सुनील शेजवळ, परिषदेच्या मुंबई जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष प्रियांका मुणगेकर, दिलीप जगताप यावेळी उपस्थित होते. यावेळी रुग्ण हक्क परिषदेच्या तर्फे आरोग्य कार्डचे वाटप देखील नागरिकांना करण्यात आले.
उमेश चव्हाण पुढे म्हणाले की, आज-काल आरोग्य विषयक काहीही अडचणी निर्माण झाल्या की लोक गुगल पे द्वारे, फोन पे द्वारे मदत करा असे मेसेज एकमेकांना पाठवतात, अशामुळे एखादी ठराविक रक्कम जमा करणे सोपे होते, मात्र दरवेळी अशा पद्धतीने हात पसरण्यापेक्षा शासनाच्या 15 लाखांपर्यंत असलेल्या योजना एकत्रितपणे गरजू नागरिकांना मिळवून देण्यासाठी रुग्ण हक्क परिषदेचे कार्यकर्ते अत्यंत पुण्याचे काम करत आहेत. प्रत्येक नागरिकाला दर्जेदार उपचार मिळाले पाहिजेत. माणूस गरीब असला तरी लाचारीने नव्हे तर स्वाभिमानाने जगला पाहिजे, यासाठी रुग्ण हक्क परिषदेचे कार्यकर्ते झटत आहेत, असेही उमेश चव्हाण म्हणाले.



















