ठाणे(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, मिलिंद राऊत
दि.१६.१०.२०२२
नवी मुंबई- करोनाकाळातील लॉकडाउनचा फायदा घेत नवी मुंबई महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम उभी राहिली आहेत. त्यामुळे पालिकेने अशा ४६ बांधकामांची यादी तयार केली आहे. अनधिकृत बांधकामे करणार्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. शिवाय अशा इमारतींत गृहखरेदी आणि व्यवहार न करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
शहरातील ४६ अनधिकृत बांधकामांची यादी पालिकेने प्रसिद्ध केली आहे. संबंधीत विकासकांना एमआटीपी अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे. या इमारतींमध्ये घरे, दुकाने खरेदी करू नये असे आवाहन केले असून नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई सुरु केली आहे. सर्व विभागांमध्ये नियमीतपणे अतिक्रमणांवर कारवाई केली जात आहे. अनधिकृत बांधकाम सुरू असल्यास संबंधीतांना नोटीस दिली जात आहे. वेळ पडल्यास गुन्हेही दाखल केले जात आहेत. यानंतरही बांधकाम सुरूच राहिल्यास त्यावर कारवाई केली जात आहे. सप्टेंबर महिन्यात शहरातील ४६ बांधकामांना नोटीस देण्यात आली आहे. विकासक व अनधिकृत बांधकाम धारकाचे नाव, अनधिकृत बांधकामाचा पत्ता, किती बांधकाम केले आहे, संबंधीतांना कधी नोटीस पाठविण्यात आली आहे याचा तपशील मनपाने प्रसिद्ध केला आहे.
विभागानुसार अतिक्रमणे-
बेलापूर – ३, नेरूळ ३, वाशी १, तुर्भे ८, कोपरखैरणे १३, घणसोली १४, ऐरोली ४, तुर्भे सेक्टर १९ मधील भूखंड क्रमांक १५ व १६ येथै वेअर हाऊसच्या जागेवर रूम बनवून लॉजींगचा व्यवसाय सुरु आहे. सेक्टर १९ ई भूखंड क्रमांक ४७ वर हॉटेल सुरु करण्यात आले आहे. सेक्टर १९ ए मधील भूखंड क्रमांक ४३ वरही लॉजींगचा व्यवसाय सुरु असून या बांधकामांनाही महानगरपालिकेने नोटीस दिली आहे.
कारवाईची मागणी….
ऐरोली गाव, रबाळे, घणसोली येथे मोठ्या प्रमाणात स्थानिक राजकीय नेत्यांच्या आशिर्वादाने भूमाफिया यांचा वावर वाढला असून स्थानिक नेत्याच्या आशिर्वादाने कोणत्याही शासकीय परवानगी विना ४-५ मजली टोळेजंग इमारती उभ्या राहत असल्याचा आरोप करुन या विरोधात विविध राजकीय पक्षांनी सामाजिक संघटनांनी आवाज उठवला आहे. ऐरोली सेक्टर १ येथील साई कॉलनी, बीट भट्टी व घणसोली गोठवली गांव येथील ५ मजली अनाधिकृत इमारत जमीनदोस्त करण्यात यावी व संबंधित विकासक यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यावे. अशी मागणी जोर धरू लागली आहे.



















