ठाणे(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, मिलिंद राऊत
दि.१९.१०.२०२२
नवी मुंबई- रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी “इच्छा नसताना नाईलाजास्तव बौद्ध धर्म स्वीकारला होता” असे बेजबाबदार वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ काल वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या राजीनामाची मागणी करून त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. परंतु नवी मुंबईतील आठवले गटाच्या महिला जिल्हा कार्यकारिणी या निषेध सभेस येऊन विरोध दर्शविला असता रिपब्लिकन सेना जिल्हाप्रमुख खाजा मीया पटेल यांना आठवले गटाकडून विरोध करण्यात आला. नामदार आठवले यांनी माफी मागितली आहे असे सांगत आंदोलन मागे घेण्यास सांगितले.
दरम्यान शाब्दिक चकमक उडत असताना पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून कोणतीही अप्रिय घटना होऊ दिली नाही परंतु, रिपब्लिकन सेना महिला जिल्हाध्यक्ष रेखा इंगळे, उपाध्यक्ष दीपा बम यांनी रिपब्लिकन महिला जिल्हाध्यक्ष शीला रमेश बोदडे व त्यांच्या महिला सहकारी कार्यकर्त्या यांच्या विरोधात निषेध सभेत व्यत्यय आणून सामाजिक सलोखा बिघडवल्याबद्दल वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात यावा या आशयाचे पत्र महिला पोलीस उपनिरीक्षक जोगळेकर यांना दिले आहे.



















