पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाच्या उदगीर मध्ये धाडी
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि.१३.०३.२०२६
उदगीर शहर व ग्रामीण भागात मटका अड्डयांवर छापे, ६६ हजार रुपयांच्या रोख रकमेसह सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत
उदगीर – नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी लातूर जिल्हयातील उदगीर भागात पोलीस पथक पाठविले होते. या पथकाने ९ मार्चला लातूर जिल्ह्यातील उदगीर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हवगीस्वामी मठाच्या समोर एका अर्धवट पडक्या घरामध्ये मटका बुक्कीवर कारवाई करत ५१७९०-रुपयांची रोकड सहित वीस हजार रुपयाचे तीन मोबाईल जप्त केले. या धाडीत एकूण नऊ आरोपीतांना ताब्यात घेवून, त्यांचेविरुध्द उदगीर शहर पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंदवून, त्याचा तपास उदगीर शहर पोलीस ठाण्यातील पोहेकॉ सरफराज गोलंदाज यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे, उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एस.टी. कॉलनी येथील पत्राच्या शेडमध्ये मटका बुकीवर कारवाई करत, २१३३० रुपयांची रोकड वीस हजार रुपयांचे दोन मोबाईल व १५००० रुपयांचे G win लॉटरीचे साहित्य जप्त केले आहे, या प्रकरणात एकूण तीन आरोपीना ताब्यात घेवून, त्यांचेविरुध्द उदगीर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंदवून, त्याचा तपास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोहेकॉ मुबारक उल्ला हे करत आहेत.उपरोक्त दोन्ही कारवायांत एकूण ७३१२० रुपयांची रोकड पाच मोबाईल व साहित्य असा एकूण १२८१२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांचेसह पोहेकॉ प्रदिप खानसोळे, पोहेकॉ संजीव जिंकलवाड, पोकॉ गणेश धुमाळ व पोकॉ कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.
आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाच्या nandedrange.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर किंवा ९१५०१००१०० या ‘खबर’हेल्पलाइनवर कळवून अशा अवैध व्यवसायांचा बिमोड करण्यासाठी आपला हातभार लावावा, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.



















