(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी – जुबेर शेख
पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंहगड रस्ता राजाराम पुलाजवळील फ्लायओव्हरचे गुरुवारी उद्घाटन केले. राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, पर्वती आमदार माधुरी मिसाळ, खडकवासला आमदार भीमराव तापकीर, पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्यासह इतर अनेक मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना पवार यांनी पुण्यातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी रस्ते आणि फ्लायओव्हरच्या कामावर भर दिला असल्याचे सांगितले. “राज्य सरकारच्या वतीने राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यात अनेक कामे सुरू आहेत. राज्यातील प्रकल्पांना वेग देण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे,” असेही त्यांनी सांगितले.
सिंहगड रस्ता फ्लायओव्हरबद्दल बोलताना, पवार यांनी याला पुणेकरांसाठी स्वातंत्र्यदिनी दिलेली भेट असे वर्णन केले. “या फ्लायओव्हरचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे आणि दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.