(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी – जुबेर शेख
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने (PCMC) 19 आणि 20 सप्टेंबरला पाणी कपात जाहीर केली आहे. या काळात नागरिकांना पाणीपुरवठा कमी होईल. जाणून घ्या पाणी कपातीचे कारण आणि वेळापत्रक.
19-20 सप्टेंबरला पाणी कपात
के, एफ, आणि ई विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या भागांमध्ये 19 सप्टेंबरच्या संध्याकाळी आणि 20 सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 19 तारखेला सकाळी पाणीपुरवठा सुरळीत असेल, परंतु संध्याकाळी पाणीपुरवठा थांबवला जाईल. 20 तारखेला कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
पाणी कपातीचे कारण
महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे संयुक्त नगर अभियंता अजय सुर्यवंशी यांच्या माहितीनुसार, भोसरी आरएस2 सबस्टेशनवर देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे ही पाणी कपात केली जात आहे. हे सबस्टेशन तळवडे नदी पंपिंग केंद्र आणि चिखली जलशुद्धीकरण केंद्राला वीजपुरवठा करते. सकाळी 10:00 ते सायंकाळी 6:00 पर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे, ज्यामुळे पाणीपुरवठा खंडित होईल.
यामुळे नागरिकांना 19 सप्टेंबर संध्याकाळपासून 20 सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने मिळण्याची अपेक्षा आहे.