एल्गार परिषद प्रकरणाच्या चौकशीकामी व नक्षलवादी कनेक्शनच्या आरोपाखाली कॉ.प्रा.आनंद तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीनअर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला व चौकशी यंत्रणेसमोर तीन आठवड्याचे मुदतीत तेलतुंबडे यांना आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले यामुळे आनंद तेलतुंबडे यांच्या अटकेचा मार्ग तपास यंत्रणांना मोकळा झाला.
तत्पूर्वी कॉ.आनंद तेलतुंबडे हे बाबासाहेब आंबेडकऱ्यांच्या घराण्याशी संबंधित असून कट्टर आंबेडकरवादी आहेत व त्यामुळेच सरकार द्वेषपूर्ण भावनेतून कॉ.आनंद तेलतुंबडे याना या प्रकरणात निष्कारण गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप “आंबेडकरी चळवळ संपली आहे”…या शिर्षकाचे पुस्तक लिहिणारे प्रकाश आंबेडकर यांनी वेळोवेळी केला आणि आनंद तेलतुंबडे यांची पाठराखण केली.
वास्तविक पाहता आनंद तेलतुंबडे हे बाबासाहेब आंबेडकरांचे नातजावई असुन मार्क्सवादी विचारधारेचे(कम्युनिस्ट) कट्टर समर्थक आहेत.कॉ. तेलतुंबडे हे आंबेडकरी विचारधारेचे आहेत म्हणून जनतेची सहानुभूती मिळविण्याचा व कातडी वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न नक्कीच निषेधार्ह आहे.केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्यात असणे म्हणजे आंबेडकरी विचारधारेचे असणे होत नाही. हा फरक असा प्रयत्न करणारांना समजण्या इतपत इथे कोणीच नादान नाहीत हे मात्र नक्की.
आनंद तेलतुंबडे हे नाव एल्गार परिषदेनंतर खऱ्या अर्थाने चर्चेत आले व तेव्हाच ते आंबेडकरी घराण्याचे जावई आहेत,आंबेडकरवादी आहेत या बाबी समोर आल्या. वास्तविकतः हे नाव अगदी आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या फिल्डवरच्या कार्यकर्त्यांनाही सहसा माहीत नव्हते.मग प्रश्न असा निर्माण होतो की तेलतुंबडे यांनी असे कोणते आंबेडकरवादी विचार प्रसार करण्याचे कार्य केले ? जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटावी म्हणून कोणती व किती आंदोलने उभी केली ? व ते सरकारला रुचले नाही ?
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची १२९ वि जयंती दि.१४ एप्रिल २०२० रोजी येणार होती या दिवसाचे महत्त्व म्हणजे या सणाची वाट समस्त भारतीय नागरिक वर्षभर आतुरतेने पहात असतात. तर हा सण जगभर साजरा केला जातो. त्यातच संपुर्ण जगाला अडचणीत आणणाऱ्या कोरोनामुळे ही जयंती समस्त भारतीय घरात राहूनच वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतील अशी आखणी समस्त आंबेडकरी जनता करत असताना अचानक १४ एप्रिलच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांचे घर,समस्त आंबेडकरी जनतेचे प्रेरणास्थान असणाऱ्या राजगृहावर काळा झेंडा फडकविला जातो व त्याचे मेसेजेस आयटी सेलच्या माध्यमातून सर्व सोशल मीडियावर पसरविले जातात आणि कसली जयंती साजरी करता अरे राजगृहावर काळा झेंडा फडकतोय ? आजच्याच दिवशी पोलिसांनी बाबासाहेबांचे नातजावई तेलतुंबडे यांना जाणीवपूर्वक अटक केलीय.असे प्रश्न विचारले जातात.हा काळा झेंडा फडकीविणारे कोण ? असे कृत्य करून त्यांना आंबेडकरी जनतेला नेमका काय मेसेज द्यायचा होता ? हा राज्यात,देशात अराजकता माजविण्याचा प्रयत्न तर नव्हता ना ? हे प्रश्न निर्माण झाल्यावाचून राहत नाहीत.
कॉ.आनंद तेलतुंबडेना खरे पाहता अटक झालीच नव्हती.त्यांनी स्वतः तपास यंत्रणांसमोर आत्मसमर्पण केले होते.मग प्रश्न असा निर्माण होतो की आत्मसमर्पण करण्यासाठी कोर्टाने तीन आठवड्यांची मुदत दिली असताना तेलतुंबडे यांनी जाणीवपूर्वक १४ एप्रिल २०२० हाच दिवस का निवडला ? आत्मसमर्पण करण्यासाठी त्यांनी बाबासाहेबांचे राजगृह हेच ठिकाण का निवडले ? काळा झेंडा राजगृहावरच का फडकविला ? आणि फडकवायचाच होता तर तो स्वतःच्या घरावर का नाही फडकविला ? आयुष्यभर कम्युनिस्ट विचारांचा प्रचार प्रसार करणाऱ्या कॉ.आनंद तेलतुंबडे यांना आंबेडकरांचे जावई व आंबेडकरवादी विचारवंत म्हणून का ओळख धारण करावी लागली ?
कॉ.आनंद तेलतुंबडे हे जर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी नाते सांगत असतील तर त्यांनी बाबासाहेबांचे विचार वाचले नाहीत का ? बाबासाहेब म्हणतात “बौद्ध तत्वज्ञानाचा मूलभूत पाया व कार्ल मार्क्सच्या तत्वज्ञानाचा मूलभूत पाया यात काहीही फरक आढळत नाही. याचाच अर्थ असा की, कार्ल मार्क्सने प्रस्थापित केलेला सिद्धांत हा नवीन नाही.तेव्हा जीवनाचा मूलभूत पाया शोधण्यासाठी कोणत्याही बौद्ध बांधवास कार्ल मार्क्सचे दार ठोठावण्याची गरज नाही.” दुसऱ्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर म्हणतात “मी माझ्या साम्यवादी मित्रांना नेहमी दोन तीन प्रश्नांची उत्तरे मागत असतो.परंतु मला प्रामाणिकपणे सांगितले पाहिजे की,माझ्या प्रश्नांची उत्तरे देण्यास ते समर्थ नाहीत.ते मजूर वर्गाची हुकूमशाही रक्तपाताने प्रस्थापित करू इच्छितात.” ज्या बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीत कार्ल मार्क्सला खोडून काढले त्यांच्या नातजावयाने कम्युनिस्ट विचारांचे ओझे वहावे व अडचणीच्या काळात बाबसाहेबांशी नाते सांगावे हा आंबेडकरी चळवळीवर,आंबेडकरवादावर एक प्रकारचा हल्लाच आहे असेच म्हणावे लागेल.
काही कालावधीपूर्वी “कबीर कला मंच” या संघटनेवर नक्षलवादी असल्याचा आरोप झाला होता. त्यातील बरेच मोहरे पोलिसांच्या तावडीत सापडले होते.त्या सर्वांनी देखील आमच्यावरील आरोप खोटे असल्याचा कांगावा केला होता. त्यातील शीतल साठे, सचिन माळी व त्यांचे साथीदार जेलवारी भोगून आलेले आहेत.जर ते निष्पाप असते तर त्यांना असा दीर्घकाळ तुरुंगवास भोगावा लागला असता का ? त्यांच्यावरील गुन्हा सिद्ध झाला नसला तरी ते निर्दोष आहेत हे देखील सिद्ध झालेले नाही.नेहमी लाल सदरा घालून वावरणारे हे कट्टर कम्युनिस्ट आंबेडकरी चळवळीच्या मजबुत कवचाखाली लपताना दिसले.इतकेच काय पण त्यांनी आपल्या सदऱ्याचा रंग देखील फिक्कट निळा असा बदलून टाकला.कपडे बदलले पण विचार आंबेडकरवादी झाले आहेत का ? तुम्ही फक्त आपली चामडी वाचविण्यासाठी आंबेडकरवादाचा वापर करणार असाल तर लक्षात असुद्या जागरूक आंबेडकरवादी हे कधीच खपवून घेणार नाहीत.कबीर कला मंचमध्ये वावरणारी ही मंडळी नंतर वंचित बहुजन आघाडीच्या स्टेजवर वावरताना व आपल्या कार्यक्रमांसाठी ग्राहक शोधताना नेहमीच दिसली हे सत्य देखील दुर्लक्षून चालणार नाही.या मंडळींना अभय देणारा नेता कोण होता हे देखील जनतेने पहायला हवे.
प्रकाश आंबेडकरांच्या साथीने वंचित बहुजन आघाडीच्या सोबत आंबेडकरी जनता लोकसभेला व विधानसभेला अगदी खंबीरपणे,प्रामाणिकपणे उभी राहिली होती.पण या जनतेला स्वप्नातही वाटले नसेल की,इतिहासात पहिल्यांदाच १४ एप्रिल २०२० ला राजगृहावर काळा झेंडा फडकविला जाईल व त्यांच्या सर्वात मोठ्या सणाला सुतक पाळण्याचा संकेत मिळेल.(असा काळा झेंडा भीमाकोरेगावला समाजावरील सर्वात मोठा हल्ला झाल्यावर देखील फडकविला गेला नव्हता हे विशेष.)
कोणी कोणत्याही विचारांचा का असेना,ज्यावर अन्याय झाला असेल त्याच्या पाठीशी आंबेडकरी जनता नेहमीच खंबीरपणे उभी राहिली आहे आणि भविष्यात देखील राहील. फक्त खोटे चित्र रंगवून आम्हास भावनिक न करता खरी परिस्थिती आमच्या समोर मांडावी हीच अपेक्षा आहे.
ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन रक्तविहिन क्रांती केली त्यांना उभ्या आयुष्यात एकदाही तुरुंगात जाण्याची वेळ आली नाही.त्याच बाबासाहेबांचे आपण वारसदार, अनुयायी असून येणाऱ्या काळात आंबेडकरी चळवळीला कसलेही गालबोट लागणार नाही याची पूर्ण काळजी आपण आंबेडकरी विचारांचे वारसदार,वाहक म्हणून आंबेडकरी जनतेने घेण्याची गरज आहे.
कॉ.आनंद तेलतुंबडे हे जर दोषी नसतील तर त्यांना निर्दोष सोडावेच लागेल…! पण त्यांच्या निष्पक्ष चौकशीची मागणी करून योग्य तो न्याय करण्याची मागणी आम्ही संविधानप्रेमी आंबेडकरवादी करणार आहोत का ? हा प्रश्नच येणाऱ्या काळातील चळवळीची दिशा ठरविणारा व आत्मपरीक्षण करणारा असेल यात तिळमात्र शंका नाही.
किरण शिंदे
(लेखक आंबेडकरी चळवळीतील एक सक्रिय ऍक्टिव्हिस्ट आहेत.)