पुणे (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०७.०१.२०२०
पुणे- महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सोमवारी माती विभागात धक्कादायक निकालाची नोंद झाली. २०१८चा महाराष्ट्र केसरी बालारफिक शेख याला चक्क चितपट करून सोलापूर शहर संघाच्या माऊली उर्फ जमदाडे याने खळबळ उडवून दिली.
पुण्यात म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. माती विभागात झालेल्या पाचव्या फेरीत बुलडाण्याच्या बालारफिक याने चांगला प्रारंभ केला. पहिल्याच मिनिटात त्याने गुण घेतला. त्यानंतर काही क्षणांनी बालारफिकने माऊलीची वरून पकड घेण्याचा प्रयत्न केला. मात्र उंचपुऱ्या माऊलीने चपळाईने हफ्ता डाव टाकून बालारफिकला अस्मान दाखविले.
या विजयासह माऊलीने माती विभागातून उपांत्य फेरी गाठली. माती विभागातील विजेता आणि गादी विभागातील विजेता यांच्यात महाराष्ट्र केसरी किताबाची लढत होणार आहे.