अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात
संग्रामपूर तहसील कार्यालयावर विराट मोर्चा…
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी -जितेंद्र तायडे
दि.०७.०७.२०२६
बुलढाणा- अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात संविधान संरक्षण समितीच्या वतीने सोमवार दि. ६ जुलै रोजी संग्रामपूर तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. शासनाने घेतलेला अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. मोर्चामध्ये तालुकाभरातील संविधानप्रेमी नागरिक, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो”, “संविधानाचा विजय असो” तसेच शासनाच्या निर्णयाविरोधातील विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला. तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. अनुसूचित जातींच्या आरक्षण व्यवस्थेवर परिणाम करणारा हा निर्णय असल्याचा आरोप करत तो तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. संविधानाने दिलेल्या अधिकारांचे संरक्षण आणि आरक्षण व्यवस्थेची मूळ रचना अबाधित ठेवण्यासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही संविधान संरक्षण समितीच्या वतीने देण्यात आला. मोर्चा शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.



















