नगरपालिकेचे दुर्लक्ष अखेर नागरिक सरसावले… नगरपालिकेला आत्मपरीक्षणाची गरज..?
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि.०७.०७.२०२६
सातारा – महाबळेश्वर तालुक्यामध्ये सध्या मान्सून पावसाने दमदार हजेरी लावली असून पावसाने महाबळेश्वरला अक्षरशः झोडपून काढले आहे. तसा पाऊस महाबळेश्वरला काही नवीन नाही. कारण महाबळेश्वर हे पावसाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. गेल्या ४८ तासांमध्ये महाबळेश्वर येथे तब्बल ३६ इंच पावसाची नोंद झाली आहे. इतरत्र होणाऱ्या पावसाची नोंद हि मिली मीटर, सेंटी मीटर मध्ये केली जाते. पण महाबळेश्वरच्या पावसाची नोंद हि इंचामध्ये ठेवली जाते त्यावरून इथल्या पावसाची कल्पना येऊ शकते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील स्कूल मोहल्ला, नामदेव व अंबिका सोसायटी येथे नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे व ड्रेनेजचे पाणी शिरले होते. एक दिवस नगरपालिका कर्मचारी व अधिकारी यांना घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधी आपत्कालीन मोहिमेमध्ये सामील झाले. परंतु काहीच तासांत सर्वजन आऊट ऑफ कव्हरेज झाले अशी तक्रार नागरिकांनी केली. केवळ काही वेळ काम दाखवून त्याचे फोटो वायरल केले गेले पण फिल्डवर काहीच काम न झाल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून असे चमकोगिरीचे प्रकार करण्यापेक्षा नगरपालिकेने मान्सूनपूर्व आपत्कालीन तयारी का केली नाही अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. स्कूल मोहल्ला येथील गल्ल्यामधून वाहणाऱ्या पाण्याचा जोर इतका होता की गल्लीमधून नदी वाहते की काय असा प्रश्न उपस्थित झाला होता. गेल्या २० वर्षांपासून येथील गल्ल्यांची अशीच परिस्थिती असल्याचे नागरिक सांगत असून त्यामध्ये किंचितही बदल घडला नसल्याचे वैषम्य असल्याचे बोलले जात आहे. तसे स्कूल मोहल्ला येथे अनेक अडचणी असून पावसाच्या पाण्याचा निचरा ही सर्वात मोठी समस्या असल्याचे बोलले जाते.
स्कूल मोहल्ल्यातून येणारे पाणी पुढे सरळ अंबिका नामदेव सोसायटी येथे जाते. पाण्याचा जोर इतका प्रचंड होता की या सोसायट्यांकडे जाणारा डांबरी रस्ता वाहून गेला.दुर्दैवाने नगरपालिकेकडून काम करण्यासाठी येथे कोणी फिरकलेच नाही.त्यामुळेत शेवटी नागरिकांनी फावडे हातामध्ये घेऊन सदर रस्ता तात्पुरता नीट केला आहे. तसेच तेथून वाहणाऱ्या पाण्याला जागा करून दिली आहे. वास्तवात हे काम नगरपालिकेच्या असताना नगरपालिकेने केलेल्या दुर्लक्षामुळे जनतेमध्ये रोष दिसून येत आहे. तर आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये नगरपालिकेची काही तरतूद आहे की नाही हा सवाल आता मोठ्या प्रमाणावर विचारला जात आहे.
दरवर्षी होणाऱ्या पावसाचे प्रमाण पाहता नगरपालिकेने मे महिन्यामध्ये गटारे साफ करून पाणी वाहण्यासाठी जागा करणे अपेक्षित होते पण तसे न झाल्याने हि परिस्थिती उद्भवल्याचे बोलले जात आहे. तसेच वेण्णा नदीपात्रात झालेल्या अतिक्रमणांमुळे तेथे पूरपरिस्थिती निर्माण होते पण पालिकेने जाणीवपूर्वक अशा अतिक्रमणांना अभय दिल्याने पुढे भविष्यात मोठी जीवित हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या काळात वेण्णा नदीपात्रात झालेल्या अतिक्रमणांवर नगरपालिका काय कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.



















