बुद्ध विचारांच्या प्रसारासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे मोठे योगदान – नगरसेवक नितीन गांगुर्डे
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, स्वप्नील इंगळे
दि.०७.०७.२०२६
पुणे- भारतीय जनता पक्षाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केवळ राष्ट्रकार्यातच नव्हे, तर महाबोधी सोसायटीच्या माध्यमातून बुद्ध विचारांच्या प्रचार-प्रसारासाठीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. मात्र, बौद्ध समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेले कार्य अपेक्षेप्रमाणे प्रकाशझोतात आले नाही. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी बौद्ध समाजाला संघटनेच्या आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध राहावे, असे प्रतिपादन भाजप एससी मोर्चाचे तालुकाध्यक्ष तथा दिंडोरी नगरपंचायतीचे नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी केले.
दिंडोरी तालुका भाजप एससी मोर्चाच्या वतीने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांसह उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ नेते चंद्रकांत राजे, विलास देशमुख, माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख, जिल्हा सरचिटणीस रणजित देशमुख, मंडल अध्यक्ष शाम मुरकुटे, तालुकाध्यक्ष नितीन गांगुर्डे आणि महिला तालुकाध्यक्षा उज्वला कोथळे-उगले यांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर झालेल्या अभिवादन सभेत रणजित देशमुख, प्रमोद देशमुख आणि चंद्रकांत राजे यांनी डॉ. मुखर्जी यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत देशाच्या एकात्मतेसाठी दिलेल्या त्यांच्या बलिदानाचे स्मरण केले.
जयंतीनिमित्त सामाजिक उत्तरदायित्व जपत एससी मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले. दिंडोरी येथील ज्युपिटर इंग्लिश मीडियम स्कूल आणि श्री ईशान्येश्वर विद्यानिकेतन या शाळांच्या परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमास दिंगबर ढाकणे, मदन लोखंडे, गणेश बुनंगे, निता भामरे, मंदा गायकवाड, माधुरी निकम, प्रमिला काळोगे, धीरज चव्हाण, कल्याणी केदारे, दीक्षा मोरे, अनुसया मानभाव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















