दिल्ली(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०७.०३.२०२०
नवी दिल्ली- जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या दरात जबरदस्त तेजी आल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक बाजारपेठेत सोन्याने नवी उच्चांकी पातळी गाठली आहे. दिल्लीव सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा प्रति १० ग्रॅम अर्थात तोळ्याचा दर ४५ हजार रुपयांच्याही पुढे गेला. दुपारच्या सत्रात सोन्याचा दर ४५ हजार ३४३ रुपयांवर गेला होता.
कोरोना विषाणूमुळे जागतिक अर्थकारणात खळबळ उडाली असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची प्रचंड प्रमाणावर खरेदी होत आहे. आगामी काळात सोन्याचे दर ५० हजार रुपये प्रति तोळ्यावर जाण्याचा अंदाज सराफा बाजारातील तज्ज्ञ व्यक्तू करीत आहेत.
काही दिवसांपूर्वीपर्यंत सोन्याचे दर ४२ हजार रुपयांच्या आसपास रेंगाळत होते. मात्र, मागील दहा दिवसांत सोन्याच्या दरात मोठी तेजी आली आहे. गुरुवारी सोन्याचे तोळ्याचे दर ४४ हजार ५७० रुपयांवर पोहोचले होते. त्यात आणखी ७७३ रुपयांची वाढ होऊन सोने ४५ हजार ३४३ रुपयांवर गेले. चांदीच्या प्रति किलोच्या दरातही १९२ रुपयांनी वाढ होऊन चांदीचे दर ४८ हजार १८० रुपयांवर पोहोचले. एकीकडे सोने आणि चांदीच्या दरात वाढ होत असताना दुसरीकडे कच्च्या तेलाचे दर घसरत असून डॉलरच्या तुलनेत रुपयाचीही घसरण सुरु आहे. जागतिक बाजारातील ब्रेंट कच्च्या तेलाचे प्रति बॅरलचे दर ४८ डॉलर्सच्या खाली घसरले आहेत.
डॉलरच्या तुलनेत रुपया ७३.९९ पर्यंत घसरला आहे. जागतिक बाजारपेठेत सोन्याचे प्रति औंसचे दर २० डॉलर्सने वाढून १६८८ डॉलर्सवर गेले आहेत.
कोरोना व्हायरसची दहशत आणि खासगी क्षेत्रातील एस बँकेवर रिझर्व्ह बँकेने घातलेले निर्बंध याचा परिणाम शेअर बाजारावरही झाला असून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज ८९४ अंकांनी घसरुन ३७ हजार ५७७ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक २८० अंकांनी घसरुन १० हजार ८९८ अंकांवर बंद झाला. सकाळी शेअर बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्स १४०० अंकांपर्यंत खाली घसरला होता. जागतिक शेअर बाजारातही मोठी घसरण सुरु आहे.



















