उस्मानाबाद(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३०.०५.२०२०
कळंब- शहरामध्ये अगदी भर बाजारात सट्टा,जुगार,मटक्याचे अड्डे खुलेआम सुरू आहेत. याकडे कोणतीही कारवाई न करता, गोरगरीब जनतेला तसेच ग्रामीण भागातून भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना व जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारे फेरीवाले यांना मारहाण करण्यातच कळंब पोलिसांना जास्तीचा रस असल्याचे दिसून येत आहे. यामुळे कळंबवासीयांना शहरात पोलीस किंवा कायद्याचे अस्तित्व आहे का ? असा प्रश्न पडला आहे..
कळंबच्या भर चौकात अगदी मुख्य रस्त्याला खेटून सदर मटक्याचा मोठा अड्डा राजरोसपणे चालत आहे. भल्या मोठ्या पत्र्याच्या शेडमध्ये, पोलिसांची किंवा कायद्याची कसलीही तमा न बाळगता, इथं कल्याण आणि मिलन मटक्याचा आकड्यांचा खेळ पैशावर सुरू आहे. या परिसरात जागोजागी पडलेल्या या चिठ्ठ्या मटका व्यवसायाचे अस्तित्व दाखवून देतात.सामान्य नागरिकांच्या नजरेतून देखील हा मटक्याचा डाव लपून राहिला नाही पोलीस मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचेच चित्र आहे.
कळंब शहरात आणखी बऱ्याच ठिकाणी असे मटक्याचे अड्डे खुलेआम सुरू आहेत. बस स्थानक परिसर,छत्रपती शिवाजी महाराज चौक, येरमाळा रोड, होळकर चौक आदी ठिकाणी ही राजरोसपणे मटक्याचे अड्डे चालतात. कळंब तालुक्यात मोठ्या प्रमाणात मटका, जुगार,सट्टा असे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र आहे. आश्चर्याची आणि धक्कादायक बाब म्हणजे भरवस्तीत सर्रास सुरू असलेले हे मटक्याचे अड्डे पोलिसांना मात्र दिसत नाहीत का ? हा फार मोठा सामान्य नागरिकांना सतावणारा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कदाचित मटका चालवणाऱ्यांकडून चिरीमिरी देऊन पोलिसांचे हात ओले केले जातात की काय ? आणि त्यामुळेच पोलीस या अवैध धंद्यांकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करतात की काय ? असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. कोरोनाच्या संकटाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन कळंब तालुक्यात हे अवैध धंदे आपले पाय रोवत आहेत.या गंभीर प्रश्नाकडे जिल्हा पोलीस यंत्रणा आतातरी लक्ष देणार का का ? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.



















