सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१७.०७.२०२०
पाटण- प्रगत आणि संवेदनशील शेती पद्धतीच्या बदलत्या यांत्रिकारणामुळे पाटण तालुक्यात शेतकरी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने पारंपरिक शेतीला फाटा देत नवीन तंत्रज्ञान अवगत करत उत्पन्न वाढीसाठी प्रयन्तशील आहेत. यामुळे कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करीत असल्याने शेतकऱ्यांचा शेती उत्पादन वाढीसाठी कल दिसून येत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच कृषी विभागाने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले असल्याचे ही यावरून दिसत आहे. तालुक्यातील कोयना कृषी विभागाने वेगवेगळ्या अवगत शेतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करत रासाटी गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले आहे. कोयना विभाग हा भातशेतीचा विभाग म्हणून ओळखला जातो, या ठिकाणी भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. कृषी विभागामार्फत भात शेतीचे नवीन तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यत पोहचविण्यासाठी कोरोना काळातही कृषी विभागाचे शेतकऱ्यांना बांधावर येऊन मार्गदर्शन झाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. यात चारसूत्री भात लागवड, भात पीक कीड रोग नियंत्रण, महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड, स्वर्गीय गोपीनाथ मुंढे अपघात विमा योजना, पंतप्रधान पीक विमा योजना, शेतीशाळा, दोरीवरील भात लागवड, एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन, खत व्यवस्थापन आदी शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजना बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येत आहेत.
चारसुत्री भात लागवड तंत्रज्ञान प्रात्यक्षिक यामध्ये चारसुत्रांचा वापर करून भातशेती केली जाते. सुत्र १ – भात रोपवाटिकेच्या जागी भाताचे तुसाची राख वापरली जाते, त्यामधून सिलीका व पालाश उपलब्ध होते. सुत्र २ – चिखलणी वेळी गिरीपुष्पाचा पाला हिरवळीचे खत म्हणून वापरला जातो. त्यातून नत्राची उपलब्धता होते. सुत्र ३ – नियंत्रित लागवड, २५×१५ सेमी वर लागवड केली जाते. सुत्र ४ – यूरीया ब्रिकेट्सचा वापर या चार सुत्रांचा भात शेतीत वापर केल्याने निश्चित आपण उत्पादन वाढवू शकतो असे कृषी सहाय्यक ए. सी. पाटील यांनी सांगीतले. यावेळी सरपंच सुरेखा कदम व उपसरपंच अश्विनी सपकाळ व गावातील शेतकरी उपस्थित होते.
▪️पाटण तालुक्यात कोयना विभागात शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीवर भर पडणार आहे. प्रगत आणि संवेदनशील शेतीकडे कृषी विभागाचे लक्ष असून शेतकरी ही प्रतिसाद देत आहेत. यामुळे नवनवीत शेतीत बदल करण्यासाठी कृषी विभाग सज्ज आहे.
कृषी सहाय्यक ए. सी. पाटील, कोयना विभाग



















