मुंबई (निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनधी, मिलिंद राऊत
दि.१२.०९.२०२२
मुंबई- वाढत्या महागाईची झळ सर्वसामान्यांना पोहचली असून जिथे जीवनावश्यक वस्तूंकरिता महागाईचे चटके सोसावे लागत आहे तिथे दुसरीकडे उपजिविकेवर देखील महागाईने कुऱ्हाड चालवली आहे. रोजच्या जीवनात उपजिविकेचे साधन म्हणून टॅक्सी चालविणारे चालक आता वाढत्या महागाईने हतबल होताना दिसत आहे, कारण इंधन दरात दिवसागणिक होणारी वाढ ‘आ’ वासून त्यांच्यासमोर उभी आहे. नुकतीच सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने टॅक्सी भाडे सुधारित करण्यात यावे याकरिता टॅक्सी चालक संघटनेने सरकारला विनंतीवजा इशाराच दिला आहे. टॅक्सी चालक संघटनेने प्रवाशी भाड्यात येत्या १५ सप्टेंबर पर्यंत वाढ करून सुधारित दर लागू करावे, अन्यथा १५ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. सध्या मुंबईत प्रति किलोमीटर २५ रुपये इतके प्रवासी भाडे आकारण्यात येते त्यामध्ये १० रुपयांची वाढ करण्यात यावी अशी मागणी टॅक्सी संघटनांनी केली आहे.
सरकार याबाबतीत काय निर्णय घेते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. जर टॅक्सी भाड्यात वाढ झाली तर प्रवाशांच्या खिशाला देखील झळ पोहोचणार असून यामुळे जनतेत नाराजी व संतापाचा सूर उमटू शकतो त्यामुळे सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे. यातून मध्यम मार्ग काय निघतो हे देखील तितकेच महत्वाचे ठरणार आहे.



















