पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०४.०३.२०२२
पुणे- महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा ‘गट-अ’ मधील जिल्हा शल्य चिकित्सक, विशेषज्ञ, पोलीस शल्य चिकित्सक आणि वैद्यकीय अधिकारी संवर्गातील आणि महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा ‘गट-अ’ मधील वैद्यकीय अधिकारी संवर्गातील अधिकारी अर्थातच ‘डॉक्टरां’चे सेवानिवृत्त होण्याचे वय ६० करण्यात आले आहे. हे ‘डॉक्टर’ अधिकारी ज्या महिन्यांत त्यांची ६० वर्ष पूर्ण करतील त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी ते सेवानिवृत्त होतील, असा नवीन शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. पूर्वी हे वय ५८ होते. महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा ‘गट-अ’ मधील संचालक, अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील अधिकारी आणि महाराष्ट्र वैद्यकीय बिना सेवा, ‘गट-अ’ मधील संचालक (वैद्यकीय), उपसंचालक (वैद्यकीय) आणि वैद्यकीय अधिक्षक संवर्गातील अधिकारी यांनादेखील सेवानिवृत्ती ६० व्या वर्षी होणार आहे. हा नियम दि. ३१ मे २०२३ पर्यंत कायम आहे. आरोग्य विभागात अनुभवी डॉक्टरांची संख्या कमी आहे. ती कायम रहावी यासाठी राज्य सरकारने २०१८ मध्ये वरिष्ठ डॉक्टरांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० केले होते. तोच निर्णय आता या नवीन सरकारी निर्णयाद्वारे तो पुढे मे २०२३ पर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. मात्र, यामुळे आरोग्य सेवेतील ज्युनियर डॉक्टर हे त्यांना पदोन्नतीच्या संधी मिळत नसल्याने नाराजी व्यक्त करत आहेत.
• यावर्षी अनेक डॉक्टर सेवानिवृत्त…
या नवीन निर्णयामुळे यावर्षी मे महिन्यात आरोग्य खात्यातील अनेक डॉक्टर सेवानिवृत्त होतील. यामध्ये ज्यांचे वय ६० झाले आहे तसेच ज्यांना एक वर्षाची मुदत वाढवून मिळाली होती त्यांना देखील यावर्षी निवृत्त व्हावे लागणार आहे. शासनाच्या नवीन नियमांची अंमलबजावणी होत असल्याने यावर्षी ज्यांचे वय ६० पूर्ण होत आहे, त्यांना याचा लाभ मिळणार नसल्याचे निश्चीत आहे.



















