सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.२४.०९.१९
फलटण- सोमवार (दि.२३) रात्री पडलेल्या दमदार पावसामुळे फलटण तालुक्यातील शेतकरी वर्ग सुखावला आहे.तत्पूर्वी दमदार पावसाच्या अभावी शेतकरी वर्ग पावसाच्या प्रतीक्षेत होत.या पावसामुळे बऱ्याच ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली आहे फलटण बसस्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार काल रात्रीच्या पावसामुळे वाटेतील ओढ्यांना आलेल्या पाण्यामुळे फलटण कांबळेश्वर,फलटण सावंतवाडा, फलटण मांडवखडक,बोडके वस्ती या मार्गावरील बससेवा दुपारपर्यंत बंद होती सकाळी सकाळी सोनवडी येथील ओढ्याला आलेल्या पाण्यामुळे वाहतूक काही काळ बंद होती मांडवखडक येथील एक पूल वाहून गेलेला आहे. गिरवी ते बोडकेवाडी दरम्यानचा एक पूल वाहून गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.मांडवखडक येथे एक मोटर सायकल पाण्यात वाहून गेली सदर व्यक्तीस वाचविण्यात यश आले जीवित हानी झालेली नाही मांडवखडक येथील बंधारा आणि पाझर तलाव पूर्णपणे भरून वाहिल्यांने बाणगंगा धरणातील पाण्याचा साठा वाढलेला आहे.धरण पूर्णपणे भरण्यास फक्त चार ते पाच फुट बाकी आहे.बऱ्याच दिवसानंतर दालवडी येथे बाणगंगा नदीच्या पुलावरून पावसाचे पुराचे पाणी वाहत असल्याचे लोकांनी पाहिले.आसपासच्या परिसरातून ओढ्यांना आणि नाल्यांना आलेल्या पाण्यामुळे बाण गंगा नदीला पूर आला आहे फलटण येथे पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.बाणगंगा नदीला बऱ्याच वर्षातून पूर आल्याने शनिनगर परिसरातील नदीकाठच्या अनेक घरात पाणी शिरले आहे त्यामुळे नुकसान झाले आहे.त्याची प्रत्यक्ष पाहणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच पंचायत समिती सदस्य विश्वजीत राजे नाईक निंबाळकर आणि पदाधिकाऱ्यांनी केली आहे.उपळवे येथे ऊस शेतीला मोठा फटका बसला आहे.कुरोली भागात विजेचे खांब पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.पर्यायाने गावातील पिण्याचा प्रश्न तसेच धान्य पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी उभा राहिला आहे. पाऊस पडल्यामुळे हवेतील उष्मा कमी होण्यास मदत झाली आहे. ओढे,नाले, वगली भरून वाहिल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.या पावसामुळे शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. खरिपाचे ५०टक्के पीक हाती येईल अशी परिस्थिती असताना दमदार पाऊस झाल्यामुळे रब्बीचा हंगाम चांगला होईल अशी शेतकर्यांना आशा आहे.



















