रत्नागिरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२१.०७.२०२०
रत्नागिरी- नगरपालिकेचे अनेक कर्मचारी कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करून कोरोना योद्ध्याची महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. मात्र ते प्रसिद्धीपासून दूर राहिले आहेत. जिल्हा रुग्णालयाचे कोरोना रूग्णालयात रूपांतर झाल्यानंतर तेथे मरण पावलेल्या कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार रत्नागिरीतच करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याच्या कुटुंबीयांनाही लांबूनच दर्शन दिले जाते. त्यानंतर अंत्यसंस्काराची पुढील जबाबदारी पालिकेच्या पथकाकडे सोपविली जाते. त्यासाठी पालिकेने दोन खास पथके तयार केली आहेत. आरोग्य निरीक्षक आरिफ शेख, संदेश कांबळे, किरण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कोरोनामुळे मरण पावले आहेत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे काम केले. कोरोनाच्या फैलावाच्या स्थितीत हे करोना योद्धे मोठ्या हिमतीने काम करीत आहेत. जिल्हा करोना रुग्णालयातून कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्यानंतर हे कर्मचारी पुढे येतात. पथकातील कर्मचारी स्वतःच्या संरक्षणासाठी पीपीई किट धारण करतात. रुग्णालयातून मृतदेह आल्यानंतर स्ट्रेचरवरून तो स्मशानभूमीत नेला जातो. जात, धर्म न बघता कोरोनामुळे मरण पावलेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतात. त्यानंतर पीपीई किट तेथेच जाळून टाकले जाते. अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर घरी जाण्यापूर्वी हे कर्मचारी काळजी घेऊन स्वतःचे निर्जंतुकीकरण करुण घेतात. हे काम करताना धोका असला तरी कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी ही मंडळी काळजी घेत आहेत. रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी या कोरोना पथकाची दखल घेतली आहे. पथकातील प्रत्येक कर्मचाऱ्याचा प्रत्येकी वैयक्तिक २५ लाखाचा विमा पालिकेने काढला आहे.



















