नाशिक (निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०५.०६.२०२०
नाशिक- निसर्ग चक्रीवादळात जिल्ह्यात कुठेही मनुष्यहानी झालेली नाही. परंतू ५६ जनावरे दगावली आहेत. १९० पक्क्या घरांचे अंशत: तर ६४ कच्च्या घरांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. शासनाकडून या निसर्ग चक्रीवादळामुळे मृत्यू झालेल्या जनावरांसाठी व झालेल्या अन्य वित्तीय हानीसाठी लवकरच पॅकेज जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान, कोविड-१९ व खरीप हंगाम पूर्व तयारी या बाबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) डॉ.आरती सिंह, उपायुक्त (महसूल) दिलीप स्वामी, विभागीय उपायुक्त (महसूल) रघुनाथ गावडे, पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, उपसंचालक (आरोग्य सेवा) डॉ.एम.आर.पट्टनशेट्टी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे, महानगरपालिकेचे वैद्यकीय विभागाचे नोडल ऑफीसर डॉ.आवेश पल्लोड आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पालकमंत्री श्री.भुजबळ म्हणाले, चक्रीवादळामुळे जिल्ह्यात १ हजार ३१७ विद्युत पोल पडले आहेत. हे विद्युत पोल तात्काळ दुरुस्त करणे अथवा नवे पोल बसविण्याचे काम तात्काळ करण्यात यावे. सद्यस्थितीत कुठल्याही गावाचा विद्युत पुरवठा पुर्णत: खंडीत आहे अशी परिस्थिती नाही. परंतु येणाऱ्या २४ तासात जिल्ह्यातील सर्व ठिकाणी विद्युत पुरवठा पुर्ववत होईल याची खबरदारी महावितरणने घ्यावी कारण की आजच्या स्थितीत विद्युत पुरवठा बंद असेल तर लोकांचे दैनंदिन सर्व व्यवहार हे ठप्प होतात. शेतकऱ्यांचा व ग्रामीण भागातला विद्युत पुरवठा शक्यतो खंडीत होणार नाही याचीही दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांना पीक कर्ज लवकरात लवकर उपलब्ध करुन द्यावे त्यात काही अडचणी असतील तर त्या तातडीने सोडविण्यात याव्यात. जे शेतकरी महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेत पात्र आहेत परंतु निवडणूका व कोविडमुळे त्यांची कर्जमुक्ती थांबली आहे. ते शेतकरी कर्जमुक्त आहेत असे गृहीत धरुन त्यांना पुढील पीक कर्ज देण्यात यावे. जिल्ह्यातील पीक कर्जाचे उद्दिष्ट्य हे मोठे आहे आणि ते सर्व बॅका जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच पूर्ण करतील, असा विश्वासही यावेळी पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी व्यक्त केला. बारदानाअभावी मका खरेदीस अडचणी येत असल्याने व्यवस्थापकीय संचालक पणन विभाग यांचेशी बैठकीतून संपर्क साधून त्यांनी टेंडर प्रक्रिया लवकर पूर्ण करून बारदान स्थानिक पणन विभागास उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना मंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्याची लोकसंख्या ही सुमारे ६२ लाख एवढी आहे. ६२ लाख लोकसंख्येच्या जिल्ह्यात केवळ ३४१ कोविड रुग्ण उपचार घेत असुन त्यातील १६ रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत. तसेच केवळ ३ रुग्ण अतिदक्षता विभागात आहे त्यामुळे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन करत असलेल्या उपाययोजना ह्या प्रभावी व यशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळे लॉकडाउन शिथील करण्याच्या दिशेने शासनाने निर्णय घेतला आहे. कोरोना आजाराबाबत आता सकारात्मक विचार करुन त्याचे आजपर्यतच्या रुग्णांची गणना करण्यापेक्षा खरोखरच आज किती रुग्ण उपचार घेत आहेत, पूर्णपणे बरे होऊन घरी गेलेले किती आहेत हे ही समाजासमोर आणण्याची जबाबदारी शासन, प्रशासन , नागरिक आणि माध्यमांचीही आहे. त्यासाठी सर्वाना ताकदीने कोरोनामुक्तीसाठी काम सुरु ठेवावे लागणार आहे. ज्या दिवशी शाळा व महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय होईल त्यादिवशी आपण जिंकलो आणि कोरोना हरला असे चित्र आपण येणाऱ्या काळात पाहू, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी झालेल्या चर्चेत विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) डॉ.आरती सिंह यांनी सहभाग घेतला व प्रशासनामार्फत निसर्ग चक्रीवादळ , खरीप हंगाम पूर्व तयारी व कोरोना नियंत्रणाबाबत केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती सादर केली.



















