सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, सुभाष जाधव
दि.१०.३.२०२०
फलटण- तालुक्यातील साखरवाडी ते जिंती, होळ, खामगाव, कोळपे वस्ती, तांबे वस्ती रस्त्याच्याकडेला काळुबाई नगर, गायकवाडवस्तीतील रस्त्यावर डीपीची दुरावस्था व असणाऱ्या झाडांच्या फाद्यांमध्ये अडकलेल्या विद्युत तारा लोंबकळलेल्या स्थितीत आहेत.
साखरवाडी ते जिंती या रस्त्याच्याकडेला असलेल्या विद्युत खांबाच्या तारा वीजवितरण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे लोंबकळत असून काही ठिकाणी झाडांच्या फांद्यांमध्ये अडकलेल्या आहेत. त्यामुळे तारांच्या घर्षणामुळे थिणग्या पडून शेतकऱ्यांच्या ऊसला आग लागत असल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे.
स्थानिकांसह प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने वीजवितरणाने झाडांच्या फांद्यांतोडून विजवाहक तारा मोकळ्या कराव्यात अशी मागणी शेतकरी नागरिकांकडून होत आहे. वीजवाहक तारा या झाडांच्या विळख्यात सापडलेल्या असून ठिक ठिकाणी लोंबकळल्या आहेत.
साखरवाडी, होळ, जिंती, खामगाव या भागात ठिक ठिकाणी डीपीचे फ्यूज गायब झाली असून त्या ठिकाणी फक्त तारा दिसून येत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत धोकादायक बाब आहे या गोष्टीकडे महावितरणचे दर्लक्ष होत असून याची त्वरीत दखल घेऊन शाळकरी मुलांच्या आणि नागरिकांच्या जीवितास असणारा धोका योग्य वेळेत ओळखून होणारा अनर्थ टाळावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.



















