बारामती(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.२७.३.२०२०
बारामती- संचारबंदीच्या काळात पोलिस आणि जमाव यांच्यातील संघर्षाच्या घटना घडत आहेत. संचारबंदीसाठी कठोर भूमिका घेणाऱ्या पोलिसांवर हल्ल्याचा बारामतीतील प्रकार धक्कादायक आहे.
होम क्वारंटाइन असलेल्या लोकांना बाहेर फिरू देऊ नये, असे सांगणाऱ्या युवकाला काही जणांनी मारहाण केली, त्यानंतर तेथे गेलेल्या पोलिस पथकावर बारामती शहरातील काही जणांनी जोरदार हल्ला चढवला.
याच्यामध्ये पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्यासह तीन अधिकारी व सहा कर्मचारी जखमी झाले आहेत. अनेकांच्या हाताला जोरदार मार लागला असून अनेकांच्या डोक्यात काठ्या घालण्यात आल्या आहेत. तर काही जणांना दगडाने देखील मारहाण करण्यात आलेली आहे.
आज दुपारी चारच्या सुमारास बारामती शहरातील जळोची येथे ही घटना घडली. जखमी पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांवर बारामतीच्या सिल्वर जुबली रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान या हल्ल्यात पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी शेंडगे , फौजदार पद्मराज गंपले व योगेश शेलार, पोलीस कर्मचारी पोपट कोकाटे, सिद्धेश पाटील , पोपट नाळे, महिला पोलीस कर्मचारी रचना काळे व स्वाती काजळे असे एकूण नऊ जण या हल्ल्यामध्ये जखमी झाले आहेत
या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. जळोची परिसरामध्ये वातावरण शांत असून या ठिकाणी राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी पाचारण करण्यात आलेली आहे. एका कुटुंबातील एक वयोवृद्ध महिला पोलिसांच्या मारहाणीत मृत्युमुखी पडली असा बनाव करून महिला पोलिसांच्या अंगावर चाल करून आल्या आणि त्यामध्ये पोलिसांच्या हातातील काठ्या हिसकावून घेत पोलिसांना मारहाण करण्यात आली. यामध्ये तेथील युवकांनी दगडांचा वापर करीत पोलिसांवर दगडफेकही केली अनेक पोलिसांना दगडांचा मुक्कामाला देखील लागला आहे.



















