पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.९.०४.२०२२
या देशाचा सर्वोत्तम राजा सम्राट अशोक होय.
पुणे – ९एप्रिल प्रतिनिधी परिवर्तनापूर्वी सम्राट अशोक हा अत्यंत क्रूर राजा असल्याचे मानले जाते. त्यांने कलिंग देशावर स्वारी करून ते युद्ध जिंकले त्या युद्धात झालेल्या रक्तपात व नरसंहारामुळे व्यथित होऊन विश्वाला दया, करुणा, शांती, अहिंसा, मैत्रीची शिकवण देणाऱ्या बौध्द धम्माचा त्यांनी स्वीकार केला. सम्राट अशोक राजाने मानवतेच्या कल्याणासाठी आपल्या राज्यात अनेक लोक कल्याणकारी योजना राबविल्या त्यांच्या राज्यात सुख समृद्धी नांदत होती. त्यांनी लोक कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडली. दया ,करुणा, शांती, मैत्रीचा संदेश दिला संपूर्ण भारतीय उपखंडात त्यांचे विशाल साम्राज्य होते.
तथागत भगवान गौतम बुद्धाने सांगितलेल्या मानवतेच्या कल्याणांचे कार्य पुढे नेले, ८४ हजार स्तूप, लेण्या, शिलालेख कोरून आशिया खंडात त्यांनी लोकोपयोगी कार्य केले. सम्राट अशोक हे या देशातील सर्वोत्तम महान सम्राट होते, असे प्रतिपादन बार्टीचे महासंचालक श्री धम्मज्योती गजभिये, यांनी बोलतांना व्यक्त केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत शनिवार ९ एप्रिल रोजी सम्राट अशोक जयंती ऑनलाइन पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बार्टीचे महासंचालक श्री धम्मज्योती गजभिये म्हणाले की , सध्या रशिया युक्रेन युद्ध सुरू असून ते मानवतेवरचे संकट असून जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज असल्याचे सांगून त्यांनी सम्राट अशोक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना डॉ. हेमंत तिरपुडे, आयुक्त, भविष्य निर्वाह निधी, तेलंगना यांनी सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन करताना म्हणाले की , सम्राट अशोकाच्या लोक कल्याणकारी राज्याची प्रेरणा घेऊनच भारतीय संघराज्य उभे राहिले. भारतीय संविधानातील मानवतावादी मूल्ये सम्राट अशोकाच्या कायदा व्यवस्थेमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. सम्राट अशोकाचे स्तंभ यावरून अशोक चक्र व राजमुद्रा घेत असताना संविधान सभेतील महत्त्वाचे संदर्भ यावेळी त्यांनी दिले. श्रीमती इंदिरा अस्वार, निबंधक, बार्टी, पुणे श्रीमती वॄषाली शिंदे, उपायुक्त तथा विभाग प्रमुख, बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी राज्यातील समतादुत विभागाचे प्रकल्प अधिकारी, समतादुत ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते.बार्टी, मुख्यालय, पुणे येथील सभागृहात सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस श्रीमती स्मिता राऊत, सहाय्यक लेखाधिकारी, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. श्री राजेन्द्र बरकडे, सहाय्यक लेखाधिकारी, श्री नितीन सहारे, प्रकल्प व्यवस्थापक, श्री सुमेध थोरात, प्रकल्प व्यवस्थापक, यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .सूत्रसंचालन श्री सुमेध थोरात, प्रकल्प व्यवस्थापक, बार्टी, पुणे यांनी केले तर आभार श्री उमेश सोनवणे, उपायुक्त तथा विभाग प्रमुख, बार्टी, पुणे यांनी मानले .