पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२२.१२.२०२१
शिरूर- भिमा कोरेगाव विजय रणस्तंभ या ठिकाणी एक जानेवारी रोजी साजरा होणारा शौर्यदिन जवळ आलेला असताना देखील सदर विजय रणस्तंभ परिसराच्या कोरेगाव भीमा आणि पेरणे या दोन्ही बाजूंनी पुणे नगर महामार्गावर कचऱ्याचे मोठमोठे ढीग साचले असून याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत आहे. कोरेगाव भीमा ता. शिरुर येथे एक जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणात शौर्यदिन साजरा केला जात असतो, गेली चार वर्षांपासून येथील सर्व कार्यक्रम प्रशासन हाती घेत असल्याने सर्व सुविधा प्रशासन पुरवीत आहे, अनेक दिवसांपासून प्रशासनाकडून येथील कार्यक्रमाची तयारी सुरु करण्यात आलेली असून यापूर्वी पुणे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी सदर ठिकाणी भेटी देखील दिलेल्या आहेत, येथील जय्यत तयारी सुरु करण्यात आलेली असताना गावामध्ये अनेक ठिकाणी नवीन सीसीटीव्ही बसविण्यात आलेले असताना येथील पुणे नगर महामार्गावरील पथदिवे देखील दुरुस्तीचे काम कोरेगाव भीमा ग्रामपंचायतने हाती घेत पथदिवे दुरुस्ती केल्याने कोरेगाव भीमा प्रकाशाने उजळली जात आहे मात्र सध्या विजय रणस्तंभ असलेल्या ठिकाणी भीमा नदीवरील पुलाच्या कोरेगाव भीमा व पेरणे गावच्या हद्दीमध्ये मोठमोठे कचऱ्याचे ढीग साचले गेले असताना याकडे स्थानिक ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत असून शौर्य दिनाचा कार्यक्रम आठ दिवसांवर येवून ठेपलेला असताना स्थानिक ग्रामपंचायत येथील स्वच्छता कधी करणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
कोरेगाव भीमा येथील पुणे कडून येणाऱ्या रस्त्यावरील कचरा उचललेला असून पुणे बाजूकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कचरा तातडीने उचलून जागा स्वच्छ केली जाईल असे कोरेगाव भीमा चे सरपंच अमोल गव्हाणे यांनी सांगितले.
विजय रणस्तंभ समोरील पुणे नगर रस्त्यावर कंपनीत जाणारे कामगार कचरा टाकत असतात यापूर्वी आधार पूनावाला हि संस्था येथील कचरा उचलून नेत होती, सध्या नेत नाही मात्र आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून तो कचरा उचलू असे पेरणेचे सरपंच रुपेश ठोंबरे यांनी सांगितले.



















