सांगली : ( निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क ) दि. ०८.०७.१८ कळंबी येथील पानिपतच्या लढाईत शौर्य गाजविणारे वीर शिदनाक यांच्या नुतनीकरण केलेल्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात पार पडला.
कळंबी येथील स्मारक गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित अशा अवस्थेत होते.आजवर येथे योध्दा शिदनाक यांचे भव्य दिव्य स्मारक व्हावे म्हणून जनते मधून जोरदार मागणी होत आहे.पण सत्ताधाऱ्यांकडून केवळ अश्वासनांशिवाय काहीच पदरी पडत नाही.हे लक्षात आल्यावर कळंबी येथील समस्त इनामदार कुटुंबियांनी व कळंबी ग्रामस्थांनी लोकसहभागातून येथे असणाऱ्या जुन्या जीर्ण स्मारकाचे नुतनीकरण केले.नुकताच या स्मारकाचा लोकार्पण सोहळा उद्योजक सि. आर.सांगलीकर यांच्या अध्यक्षतेखाली भैय्याजी खैरकर,सचिन मून(लॉर्ड बुद्धा टी व्ही),किरण शिंदे (संस्थापक अध्यक्ष बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप,महाराष्ट्र राज्य)यांचे हस्ते सुभाष पाटील(मा. सभापती, मिरज)मानसिंगराव कुमठेकर(इतिहास संशोधक) यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
============================================================
शिदनाक हे वेग वेगळ्या पिढ्यात होऊन गेले आहेत.शिदनाकचे वडील ‘खंडनाक’ यांनी मिरज किल्याच्या लढाईत मोठा पराक्रम गाजविला.त्यांच्या या शौर्याबद्दल सातारच्या शाहू महाराजानी १७३९ साली त्यांना कळंबी हे गाव इनाम दिले होते.त्यांचे पुत्र शिदनाक उर्फ ‘काळनाक’ यांनी पानिपतच्या प्रसिद्ध लढाईत शौर्य गाजविले त्यामध्ये ते धारातीर्थी पडले.या बलिदानाबद्दल माधवराव पेशव्यांनी त्यांचे पुत्र ‘राजनाक’ यांना कळंबी हे गाव पूर्ववत इनाम करून दिले.’राजनाक’ यांनी खर्ड्याच्या लढाईसह अन्य बऱ्याच लढाईत पराक्रम गाजविला ============================================================
कार्यक्रमाचे प्रास्ताविक धम्माचारी सुभाष इनामदार यांनी केले.याप्रसंगी किरण शिंदे यांनी विचार मांडताना शिदनाक हे कोणत्याही एका जातीचे प्रतिक नसून ते शौर्याचे प्रतिक असून समस्त सांगलीकरांचे भुषण आहेत.त्यांचे भव्य दिव्य स्मारक होण्यासाठी सर्व कळंबीकरांनी संघटित होऊन प्रयत्न करायला हवेत.शिदनाक हे समस्त आंबेडकरी अनुयायांसाठी तसेच सर्व राज्यासाठी एक प्रेरणास्रोत आहेत. शिदनाकांची प्रेरणा घेऊन अनेक लढवय्ये लष्करी सैनिक घडविण्यासाठी येथे एक लष्करी प्रशिक्षण शाळा निर्माण करण्यात यावी अशी संकल्पना देखील त्यांनी यावेळी मांडली. सि. आर.सांगलीकर यांनी शिदनाक यांच्या स्मारकासाठी दोन एकर जमीन देण्याची घोषणा केली.सुभाष पाटील यांनी सर्व कळंबीकर या स्मारकासाठी भरीव योगदान देणार असल्याचे यावेळी नमूद केले.भैय्याजी खैरकर यांनी इतिहासावर प्रकाश टाकला व वीर शिदनाक यांच्या इतिहासाची प्रसिद्धी व प्रचार ‘लॉर्ड बुद्धा’ टीव्ही च्या माध्यमातून करण्यास प्रयत्नशील असल्याचे सांगीतले.उपस्थितांचे आभार प्रमोद इनामदार यांनी मांडले.यावेळी सर्व मान्यवरांचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सी. आर.सांगलीकर,भैय्याजी खैरकर,किरण शिंदे,मानसिंग कुमठेकर,वृत्तपत्र निर्भीड पत्रकारचे नंदकुमार जोगदंड,सुभाष इनामदार,मिलिंद इनामदार,महेंद्र इनामदार,प्रमोद इनामदार,कुमार इनामदार, दादा इनामदार,प्रकाश इनामदार, शरद इनामदार, रवी कसबेकर,’बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपचे’ संदीपभाऊ जोगदंड,सुमित गायकवाड, केतन जगताप,विकास ओव्हाळ,अजय शिंदे,शरद ओव्हाळ,नितीन फडतरे,सातारा जिल्हाध्यक्ष प्रशांत मोरे,महाबळेश्वर तालुकाध्यक्ष सुमित कांबळे,अनिकेत मोरे,जिशान शारवान यांचेसह मान्यवर उपस्थित होते.



















