नेरुळमध्ये पावसाच्या पाण्यात विद्युतप्रवाह; दोन विद्यार्थिनी जखमी
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, अमोल अभंग
दि.०३.०६.२०२६
मुंबई – नवी मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नेरुळ येथे बुधवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. एल. पी. ब्रिजखाली बिकानेर स्वीट्ससमोरील परिसरात शॉर्टसर्किट झाल्यानंतर साचलेल्या पाण्यात विद्युतप्रवाह पसरल्याने दोन अल्पवयीन विद्यार्थिनी जखमी झाल्या.
शुभांगी वालखंडे व उज्वला वाघ (दोघीही वय १५) या विद्यार्थिनी शाळेत जात असताना त्या विद्युतप्रवाहाच्या संपर्कात आल्या. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांची सुटका करून त्यांना डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी त्यांना वाशी येथील फोर्टिस रुग्णालयात हलविण्यात आले.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच शॉर्टसर्किट व विद्युतप्रवाहाची नेमकी कारणे शोधण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून तपास सुरू करण्यात आला आहे.



















