घराच्या वाटणीच्या वादातून भावाचा लोखंडी रॉडने खून; चुलता अटकेत
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, देवम्मा ददली
दि.०२.०७.२०२६
पिंपरी काळेवाडी परिसरातील कृष्णा गार्डन सोसायटीत घराच्या वाटणीच्या वादातून आणि कौटुंबिक रागाच्या भरात एका ३२ वर्षीय तरुणाचा लोखंडी रॉडने मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी मृताच्या ६२ वर्षीय चुलत्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १ जुलै रोजी सकाळी ११.४० ते दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान कृष्णा गार्डन सोसायटी, सी विंग, फ्लॅट क्रमांक १९, जीवन चौक, काळेवाडी येथे घडली. या प्रकरणी रोशन ऊर्फ मयूर राजेंद्र पाखरे वय २९ यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी संजय उमाजी पाखरे वय ६२ यांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात घराच्या वाटणीवरून सुरू असलेला वाद, तसेच मृत गणेश राजेंद्र पाखरे याच्या नोकरीबाबतचा राग आणि पत्नी-मुले आपल्याला सोडून जाण्यासाठी गणेशच कारणीभूत असल्याचा आरोपीचा संशय होता. याच संतापातून आरोपीने गणेशच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून त्याचा खून केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धुमाळे करीत आहेत.



















