नवी मुंबईत मुसळधार पावसामुळे दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी..
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी, अमोल अभंग
दि.०३.०७.२०२६
मुंबई – नवी मुंबई शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) प्रशासनाने गुरुवार, ३ जुलै रोजी दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली.
शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून, काही ठिकाणी रस्त्यांवर जलसाठा निर्माण झाला आहे. हवामान विभागानेही अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला.
महानगरपालिकेने पालकांना अनावश्यक बाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले असून, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही सांगितले आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी NMMC चे अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन पथके सतर्क ठेवण्यात आली आहेत.
दरम्यान, पुढील हवामान परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार आणखी निर्णय घेतले जातील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



















