विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगरात भव्य आंदोलन; सरकारला मुंबई मोर्चाचा इशारा
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, योगीराज सरदार
दि.०७.०७.२०२६
छ. संभाजीनगर – महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समितीच्या वतीने तसेच प्रा. विठ्ठल कांगणे यांच्या पुढाकारातून छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर विद्यार्थ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी भव्य आंदोलन करण्यात आले. यावेळी हजारो विद्यार्थी सहभागी झाले असून, आंदोलनकर्त्यांनी परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याची जोरदार मागणी केली.
आंदोलनादरम्यान उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत त्यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा दिला. विद्यार्थ्यांनी MPSC कडून ऑनलाइन परीक्षा पद्धत रद्द करून पूर्वीप्रमाणे ऑफलाइन परीक्षा घेण्यात यावी, पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा करण्यात यावा, नॉर्मलायझेशनची पद्धत रद्द करावी, शिक्षकांसाठीची TET परीक्षा रद्द करण्यात यावी, पोलीस भरतीची वयोमर्यादा वाढवावी, MPSC मार्फत वर्ग ३ व ४ च्या भरतीचा अभ्यासक्रम तातडीने जाहीर करावा तसेच विविध परीक्षांसाठी एकच शुल्क आकारण्यात यावे, अशा प्रमुख मागण्या मांडल्या.
या आंदोलनात , प्रा. विठ्ठल कांगणे, प्रा. नितेश कराळे, भाई दीपक केदार, रविराज साबळे, अभिजीत दिपके, रमेश पाटील, प्रा. बाळासाहेब शिंदे, त्रिशूल पाटील यांच्यासह विविध विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी वक्त्यांनी वारंवार होणारी पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील गोंधळ, बदलणारे नियम आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याची तीव्र खंत व्यक्त केली. विद्यार्थ्यांचा संघर्ष हा न्याय्य, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त परीक्षा व्यवस्थेसाठी असल्याचे सांगण्यात आले.
सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा हजारो विद्यार्थी मुंबईत धडक देत तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.



















