महामार्गावरील खड्डे त्वरित बुजवा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
⚫अकोल्यात संभाजी ब्रिगेड आक्रमक
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, योगीराज सरदार
दि.०७.०७.२०२६
अकोला- अकोला जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची पावसामुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढत असल्याने संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संबंधित अभियंत्यांना निवेदन देत तातडीने खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे.
संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी अकोला येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. महामार्गावरील सर्व जीवघेणे खड्डे तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने बुजवावेत, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.
महामार्गाची दुरवस्था कायम राहिल्यास आणि प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अनेक वाहनधारक उपस्थित होते. पावसाळ्यात महामार्गावरील खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीमुळे प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडूनही होत आहे. आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या मागणीवर कोणती भूमिका घेते, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.



















