माळशेज-भोरांडे पंप स्टोरेज प्रकल्पाविरोधात १७ ऑगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलन
निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि. १६.०८.२०२६
जुन्नर- जुन्नर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या अदानी समूहाच्या माळशेज-भोरांडे पंप स्टोरेज प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असून, या प्रकल्पाची दि. २१ ऑगस्ट रोजी होणारी जाहीर जनसुनावणी रद्द करण्याच्या मागणीसाठी पर्यावरणप्रेमी, शेतकरी व आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी अंजनावळे, ता. जुन्नर येथे या प्रकल्पाची जाहीर जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. मात्र, प्रकल्पामुळे पर्यावरण, जलस्रोत, शेती, जंगल तसेच आदिवासी भागावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
दि. १४ ऑगस्ट रोजी जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली अंजनावळे येथे झालेल्या शासकीय बैठकीत उपस्थित नागरिकांनी एकमुखाने जनसुनावणी रद्द करण्याची मागणी केली. माणिकडोह धरणाच्या लाभक्षेत्रावरही या प्रकल्पाचे दूरगामी परिणाम होऊ शकतात, तसेच स्थानिक अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभांना विश्वासात न घेता प्रक्रिया पुढे नेली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
दरम्यान, दि. १५ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे यांच्या नेतृत्वाखाली हजारो नागरिक रस्त्यावर उतरून प्रकल्पाला विरोध केला. सामाजिक कार्यकर्ते सुरज वाजगे हेही जनसुनावणी रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील सात दिवसांपासून जुन्नर येथे उपोषणाला बसले असून, प्रशासनाने अद्याप त्याची अपेक्षित दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर सह्याद्री वाचवा संघर्ष समिती, जुन्नर तालुका तसेच विविध पर्यावरणप्रेमी आणि आदिवासी संघटनांनी सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून वाकडेवाडी, पुणे येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाबाहेर बेमुदत धरणे (मुक्कामी) आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
“जुन्नर तालुक्यातील पर्यावरण, जलस्रोत, जंगल, शेती आणि आदिवासींचे हक्क अबाधित राहिले पाहिजेत. जनसुनावणी रद्द झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही,” अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.
या आंदोलनात सर्व समाजबांधव, शेतकरी, आदिवासी बांधव, पर्यावरणप्रेमी नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सह्याद्री वाचवा संघर्ष समिती, जुन्नर तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे..



















