एमकेएस कंपनीकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ
वाहनांमधून सिमेंट काँक्रीट व गिट्टी रस्त्यावर सांडल्याने दुचाकीस्वारांना धोका; अपघातांची शक्यता वाढली
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि. १६.०९.२०२६
संग्रामपूर – तालुक्यातील नवीन भोन ते वसाडी रस्त्याचे काम सध्या सुरू असून या रस्त्यावर सिमेंट काँक्रीट टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, काँक्रीट वाहून नेणाऱ्या मोठ्या हायवा वाहनांमधून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात काँक्रीट मिश्रित गिट्टी सांडत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
वाहनांच्या मागील बाजूस योग्य खबरदारी न घेतल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी सिमेंट काँक्रीट व गिट्टी पडत आहे. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला असून वाहने घसरून अपघात दररोज या ठिकाणी अपघात होत आहेत .
दररोज या रस्त्यावरून बोडखा ,भिलखेड,कवठळ,काकोडा, इटखेड,पेसोडा, कुंभारखेड भोन या गावातील नागरिकांची तसेच तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिली ते ग्रॅज्युएट तसेच पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाहनांची तसेच नागरिकांच्या वाहनांची वर्दळ या रस्त्यावरून असते. त्यामुळे मोठमोठ्या हायवा वाहनातून पडणाऱ्या सिमेंट काँक्रीट मिक्स गिटटीमुळे वाहन घसरून मोठा अपघात या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे संबंधित कंपनीने रस्त्यावर पडणाऱ्या सिमेंट काँक्रीट मिक्स गिट्टी वर कोणतीही उपायोजना न करता नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यावर पडलेल्या गिट्टीमुळे दुचाकी वाहने स्लीप होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराने काँक्रीट वाहतूक करणाऱ्या वाहनांवर योग्य झाकण अथवा सुरक्षित वाहतूक व्यवस्था करावी आणि रस्त्यावर सांडलेले साहित्य तातडीने हटवावे, अशी मागणी होत आहे.
एमकेएस कंपनीच्या कामाच्या ठिकाणी संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.



















