नाशिक(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२८.०४.२०२२
मालेगाव- तालुक्यातील झोडगे गावात दोन महिन्यांपासून एका मटका-जुगार अड्ड्याने चांगलाच जम बसवत अनेकांची आर्थिक पिळवणूक केली. याबाबत ग्रामीण दौर्यावर असताना राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांना माहिती मिळाली असता, त्यांनी तत्काळ वरिष्ठ पोलिस अधिकार्यांशी चर्चा करित विशेष पोलिस पथकासह ‘त्या’ ठिकाणी छापेमारी करित अड्डा उद्ध्वस्त केला.
सोमवारी दि. २५ दुपारी २ वाजेच्या सुमारास ही धडक कारवाई झाली. याबाबत तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कारवाईची प्रक्रिया सुरु असून, त्यानंतर अधिकृत माहिती देण्यात येईल, असे सांगितले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कृषिमंत्री भुसे हे सोमवारी झोडगे परिसरात कार्यक्रमानिमित्त गेले होते. तेव्हा त्यांना झोडगे-अस्ताणे रस्त्यावरील मटका जुगार अड्ड्याबद्दल माहिती मिळाली. साधारण दोन महिन्यांपूर्वी हा क्लब सुरु झाला होता. अल्पावधीत जास्त पैसे कमविण्याच्या आमिषाने अनेक युवक या गैरमार्गाला लागलेत आहेत.