रायगड(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, अमित साहू. दि.१६.१०.२०२३
रायगड- रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालय फुंडे येथे १४ सप्टेंबर हिंदी दिवसाचे औचित्य साधून हिंदी दिवस कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या हिंदी विभागामार्फत करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून मुंबई विद्यापीठाचे हिंदी विभाग अध्यक्ष प्रो. डॉ. दत्तात्रय मुरूमकर उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात हिंदी भाषेची गौरवशाली परंपरा तसेच साहित्य, मनोरंजन, नोकरी, प्रशासन, जाहिरात, अनुवाद, तंत्रज्ञान, संशोधन आणि सोशल मीडिया या विविध क्षेत्रांमध्ये हिंदीचे असलेले निर्विवाद महत्त्व स्पष्ट केले. भारतीयांच्या अस्मिता व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या हिंदी भाषेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक प्रयोग होत असल्याचे सांगितले. हिंदी भाषेच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमध्ये विशेषतः अनुवाद इत्यादी क्षेत्रांमध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. हिंदी दिवसाचे औचित्य साधून हिंदी विभागाच्या माध्यमातून संस्कार भित्तिपत्राचे विशेष प्रकाशन ज्यामध्ये हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कार्यरत असलेल्या विविध संस्थांची माहिती संकलित केली होती त्याचबरोबर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त हिंदीच्या प्रसिद्ध साहित्यकारांचे जीवन आणि त्यांच्या साहित्याचा परिचय करून देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन तसेच हिंदी विभाग आणि महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या माध्यमातून हिंदी साहित्यातील विविध विषयावरील महत्त्वपूर्ण पुस्तकांचे प्रदर्शन या विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. भित्तिपत्राचे प्रकाशन, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त हिंदीच्या साहित्यकारांचा परिचय करून देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन व पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन प्रो. डॉ. दत्तात्रय मुरूमकर यांच्या हस्ते झाले. या विविध उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांनी खऱ्या अर्थाने हिंदी दिवस साजरा केल्याचे समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. जी. पवार यांनी आपल्या भाषणामध्ये हिंदी भाषेचे महत्त्व दैनंदिन जीवनातील व्यवहारापासून ते साहित्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे आहे हे स्पष्ट केले. तसेच हिंदी भाषेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपले करिअर करावे असे मार्गदर्शन केले. महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२३ पासून सुरू झालेल्या एम. ए. हिंदी या पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन नोकरी आणि संशोधनातील उपलब्ध असलेल्या विविध संधीचा फायदा घ्यावा असे मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे प्रो. डॉ. दत्तात्रय मुरूमकर व प्राचार्य डॉ. पी. जी. पवार यांचे सुंदर स्केच असलेल्या फोटो फ्रेम त्यांना भेट देण्यात आल्या. अतिशय रेखीव व सुंदर स्केच कु. बबीता राजभर या विद्यार्थिनीने बनवले होते. मान्यवरांनी तिचे खूप कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तृतीय वर्ष बी.ए. ची विद्यार्थिनी पायल इनकर, प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रथम वर्ष एम. ए. ची विद्यार्थिनी प्रतिज्ञा म्हात्रे, तसेच आभार प्रदर्शन तृतीय वर्ष बी. ए. ची विद्यार्थिनी सपना बघेल हिने केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्ष बी. ए. ची विद्यार्थिनी सयोनी पावसे हिने केले.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास महाले, हिंदी विभाग अध्यक्ष डॉ. झेलम झेंडे, हिंदी विभागाच्या प्राध्यापिका डॉ. सुजाता पाटील, प्रा. राम गोसावी, डॉ. एम. सी. सोनवले, डॉ. संदीप घोडके उपस्थित होते. हिंदी दिवसाच्या या कार्यक्रमाला विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदी विभाग अध्यक्ष डॉ. झेलम झेंडे व डॉ. सुजाता पाटील यांचे मार्गदर्शन व हिंदी विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.



















