पावसाळी अधिवेशनात आमदार संजय गायकवाड यांचा बुलढाण्यासाठी बुलंद आवाज; शेतकरी, रेल्वे, सिंचन, रस्ते व पायाभूत सुविधांबाबत ठोस मागण्या…
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, जितेंद्र तायडे
दि.१०.०६.२०२६
बुलढाणा- विधानसभेत बुलढाणा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा प्रभावीपणे मांडला; रेल्वेमार्ग, चौपदरीकरण, नदीजोड प्रकल्प व पंचायत समिती इमारतींसाठी शासनाचे लक्ष वेधले
महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख संजय गायकवाड यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडत शासनाचे लक्ष वेधले. शेती, सिंचन, रेल्वे, रस्ते, वाहतूक, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच प्रशासकीय पायाभूत सुविधांबाबत त्यांनी अभ्यासपूर्ण भूमिका मांडत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस मागण्या केल्या.
सभागृहात बोलताना आमदार गायकवाड यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक जनुकीय तंत्रज्ञानाच्या वापरावरील अनावश्यक अडथळे दूर करण्याची गरज व्यक्त केली. आधुनिक शेतीला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी माल विक्रीचे अधिक स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान नियमांमध्ये आवश्यक सुधारणा करून शेतकऱ्यांना मुक्त बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बुलढाणा–चिखली मार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न उपस्थित करत त्यांनी या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामातील प्रशासकीय व आर्थिक अडथळे तातडीने दूर करून कामाला गती देण्याची मागणी केली. याशिवाय बुलढाणा शहराचा बाह्यवळण रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा तसेच राजूर घाटातील एकेरी वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
खामगाव–बोथा मार्गावरील वनक्षेत्रामुळे रात्रीच्या वाहतुकीत निर्माण होणाऱ्या अडचणींकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा मार्ग सुरक्षित व अखंड सुरू ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी सूचना त्यांनी शासनाला केली.
बुलढाणा जिल्हा आजही रेल्वे कनेक्टिव्हिटीपासून वंचित असल्याची खंत व्यक्त करत आमदार गायकवाड यांनी मलकापूर–मोताळा–बुलढाणा–चिखली असा सुमारे १२५ किलोमीटरचा नवीन रेल्वेमार्ग मंजूर करण्याची जोरदार मागणी केली. हा रेल्वेमार्ग उभारल्यास उद्योग, व्यापार, शिक्षण, पर्यटन, रोजगार आणि दळणवळणाला मोठी चालना मिळेल तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
सिंचनाच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी वैनगंगा–नळगंगा नदीजोड प्रकल्पाची व्याप्ती वाढवून मोताळा आणि बुलढाणा तालुक्यालाही त्याचा लाभ देण्याची मागणी केली. मोताळा तालुका हा राज्यातील अवर्षणग्रस्त व आत्महत्याग्रस्त तालुक्यांपैकी एक असून या प्रकल्पाचा विस्तार झाल्यास सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल आणि हजारो शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय बुलढाणा व मोताळा पंचायत समितीच्या शंभर वर्षांपूर्वीच्या जुन्या इमारतींच्या जागी आधुनिक प्रशासकीय इमारती उभारण्यासाठी आवश्यक निधी मंजूर करण्याची मागणीही त्यांनी विधानसभेत केली.
सभागृहातील चर्चेदरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी लोकशाही परंपरा आणि सभागृहाची प्रतिष्ठा जपणाऱ्या अध्यक्षांचे आभार व्यक्त केले. बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असलेला प्रत्येक प्रश्न सातत्याने, अभ्यासपूर्ण आणि ठामपणे सभागृहात मांडत राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी संघर्ष करणे हेच आपले कर्तव्य असून, बुलढाणा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक प्रत्येक प्रश्न शासन दरबारी ठामपणे मांडत राहू, असा निर्धार आमदार संजय गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केला.



















