मोशी कचरा डेपो दुर्घटना बचावकार्य सुरूच; आणखी सहा जणांना बाहेर काढण्याची शक्यता, नातेवाईकांचा संताप
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, उद्धव कुंभार
दि. १०.०७.२०२६
पिंपरी- मोशी येथील महापालिकेच्या कचरा डेपोमध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर बचावकार्य दुसऱ्या दिवशीही युद्धपातळीवर सुरू असून, प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आज सायंकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत आणखी सहा जणांना बाहेर काढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. एनडीआरएफ, भारतीय सेना, महापालिका व पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस प्रशासन आणि इतर यंत्रणा अविरतपणे ढिगारा हटवून शोधमोहीम राबवत आहेत.
या दुर्घटनेत आतापर्यंत अनेक नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली असली, तरी भावेश वाणी यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. अद्याप काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता असून त्यांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, आतमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी संताप व्यक्त केला. बचावकार्य अधिक वेगाने करण्याची मागणी करत त्यांनी प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली. आपल्या नातेवाईकांना लवकरात लवकर सुरक्षित बाहेर काढावे, अशी मागणी त्यांनी केली. काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी नातेवाईकांशी संवाद साधत बचावकार्य अखंड सुरू असल्याची माहिती देत त्यांना धीर दिला.
घटनास्थळी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून बचावकार्यावर सतत देखरेख ठेवत आहेत. एनडीआरएफचे श्वान पथक आणि जड यंत्रसामग्रीच्या सहाय्याने शोधमोहीम सुरू असून प्रत्येक क्षण महत्त्वाचा मानून बचावकार्य सुरू आहे.
प्रशासनाकडून सायंकाळपर्यंत बचावकार्यात महत्त्वपूर्ण प्रगती होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून, पुढील अधिकृत माहिती मिळाल्यानंतर अद्ययावत माहिती जाहीर करण्यात येणार आहे.



















