मोरारजी गोकुळदास ग्रामीण रुग्णालयात पुन्हा शासनाच्या/नगरपालिकेच्या ताब्यात देण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन- किरण शिंदे
निर्भीड पत्रकर न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि. ३०.०६.२०२६
सातारा – महाबळेश्वर या प्रसिद्ध जागतिक पर्यटन स्थळावर असलेले मोरारजी गोकुळदास ग्रामीण रुग्णालय खासगी संस्था बेल एयरच्या तावडीतून मुक्त करून शासनाने पूर्ववत सेवा द्याव्यात या मागणीसाठी समाजसेवक किरण गोरखनाथ शिंदे यांनी दिनांक ०६.०७.२०२६ रोजी तीव्र आंदोलन करीत असल्याचा इशारा तहसीलदार महाबळेश्वर यांना लेखी निवेदन देऊन केला दिला आहे.
या विषयीची अधिक माहिती अशी की, महाबळेश्वर तालुक्यातील जनतेला व येथे येणाऱ्या पर्यटकांना तात्काळ व योग्य वैद्यकीय सेवा मिळाव्यात या उदात्त हेतूने शेठ मोरारजी गोकुळदास या दानशूर व्यक्तीने आपल्या खासगी मालकीची, मोक्याच्या ठिकाणी असणारी करोडो रुपयांची मिळकत महाबळेश्वर नगरपालिकेला दान दिली होती. महाबळेश्वर नगरपालिका येथे दवाखाना चालवत होती. काही काळाने सदरचा दवाखाना व मिळकत सातारा जिल्हा परिषद यांच्याकडे वर्ग करण्यात आली. व काही काळाने तीच मिळकत दवाखान्यासह राज्य शासनाकडे वर्ग करण्यात आली. महाबळेश्वर तालुका हा दुर्गम तालुका आहे. या तालुक्यातील जनता ही शेतकरी,कष्टकरी गरीब जनता आहे. या जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळण्याची मागणी वारंवार केली जाते. परंतु येथील जनतेला ना इलाजास्तव वाई, सातारा, पुणे येथे उपचार घेण्यासाठी जावे लागते. जे अत्यंत खर्चिक आहे. तसेच पेशंट महाबळेश्वर येथून पुढील उपचारासाठी बाहेर नेताना वाटेतच दगावल्याची अनेक उदाहरणे आहेत.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वरच्या जनतेला व पर्यटकांना चांगल्या वैद्यकीय सोयी मिळाव्यात म्हणून प्रायोगिक तत्वावर महाबळेश्वर स्थित मोरारजी गोकुळदास ग्रामीण रुग्णालय हे पाचगणी स्थित बेल एअर या खासगी संस्थेला काही वर्षांपूर्वी चालवण्यासाठी दिले आहे. परंतु महाबळेश्वरच्या जनतेच्या मागील शुक्लकाष्ठ काही सुटण्याचे नाव घेत नाही. आजही तालुक्यातील रुग्णांना आरोग्याच्या सेवेसाठी बेल एअर कडून अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पेशंट सोबत येथील डॉक्टर उद्धट वर्तन करतात जसे काही गोर गरीब पेशंटवर ते खिशातील पैशांनी इलाज करत आहेत. पेशंट सोबत आलेल्या नातेवाईकांसोबत देखिल येथील डॉक्टर उद्धट वर्तन करतात. येथे केवळ सर्दी खोकल्यावर इलाज केला जातो. मोठ्या आजारांसाठी त्यांचे वाई स्थित हॉस्पिटलला पाठवले जाते. जेथे भरमसाठ पैसे आकारले जातात. ह्रदय विकाराचे पेशंटला कोणताही प्राथमिक इलाज न करता वाई- सातारा- पुणे येथे पाठविले जाते. अशावेळी रस्त्यामध्ये पेशंट दगावल्याचे अनेक उदाहरणे देता येतील. गरोदर महिलांवर येथे केवळ तात्पुरते इलाज केले जातात. अत्यावश्यक असलेल्या सोनोग्राफीसाठी वाईला पाठवले जाते. सिजेरियनचे पेशंट येथे घेतलेच जात नाहीत. त्यांना देखील वाई सातारा येथे पाठवले जाते. हॉस्पिटलला मार्केटमधून सहज जाता यावे म्हणून पायऱ्या असणारे जुने दोन मार्ग अस्तित्वात आहेत. त्या दोन्हीही मार्गांची अतिशय दुर्दशा झाली आहे. व सदरील मार्ग हे सायंकाळी ६ वाजता बंद केले जातात. या मार्गांची स्वच्छता केली जात नाही. सदरील मार्गांवर पथदिवे नाहीत तसेच अनेक पायऱ्या या तुटलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा वळसा घालून दवाखान्यात जावे लागते. जे आजारी रुग्णांना त्रासदायक आहे.. दवाखान्यात गेलेल्या पेशंटला डॉक्टर स्वतः चेक करत नाहीत. तसेच ते पेशंटला तुच्छतेची वागणूक देतात. सगळेच डॉक्टर हे अतिशय वृद्ध व काम करण्याचे परिस्थितीमध्ये नसल्याने ते रुग्णांना व्यवस्थित सर्व्हिस देत नाहीत. मरणासन्न अवस्थेतील डॉक्टरांमुळे दवाखाना देखिल मरणासन्न झाला आहे.दवाखान्यातील आधुनिक मशिनरी अक्षरशः धूळ खात पडलेल्या आहेत. दवाखान्यात तज्ञ डॉक्टर नेमलेले नाहीत त्यामुळे रुग्णांना योग्य इलाज मिळत नाही. डॉक्टरांची शैक्षणिक अर्हता ओपीडी बाहेर लिहिलेली नाही. रुग्णालय परिसरामध्ये पिढ्यानपिढ्या राहणारे श्रीनिवास किसन यादव यांचे घरी दिलेले पाण्याचे कनेक्शन मग्रूर बाजीराव अंबराळे याने बेकायदा तोडलेले आहे. व मानवाधिकाराचे उल्लंघन केले आहे. रुग्णालयात चांगली सेवा द्या असा आग्रह केल्याने स्थानिक जबाबदार नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत.
महाबळेश्वरच्या जनतेला या हॉस्पिटल शिवाय दुसरा पर्याय नाही.तरी आमचे हक्काचे हॉस्पिटल जे करोडो रुपयांचे किमतीचे आहे ते अशा बेजबाबदार खासगी संस्थेला चालवण्यासाठी देऊ नये. ते शासनाने पुन्हा वर्ग करून घ्यावे व येथील जनतेला उत्तमोत्तम आरोग्यसेवा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी आम्ही हजारो महाबळेश्वरच्या पीडित नागरिकांसोबत महाबळेश्वर तहसील कार्यालयाबाहेर दिनांक ०६.०७.२०२६ रोजी तीव्र आंदोलन करणार असल्याचे किरण शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सदरील बाब हि महाबळेश्वरच्या जनतेच्या अत्यंत निकडीची असल्याने सुज्ञ जबाबदार नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हान किरण शिंदे यांनी केले आहे.



















