चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१८.०६.२०२०
नागभीड- तालुक्यातील तळोधी बा. हे परिसरातील मुख्य ठिकाण असून परिसरातील जनता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात. सोनापूर,येनोली,वैजापूर – तळोधी या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते तळोधी हे अप्पर तहसील चे ठिकाण असल्यामुळे परिसरातील व सोनापूर,येनोली येथील चार चाकी व दुचाकीने प्रवास करणारे या मार्गाचा वापर करतात. परंतु या मार्गावर मोठंमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीस अडचण निर्माण झाली आहे. तळोधी हे परिसरातील मोठी बाजारपेठ असून दैनंदिन गरजा भागवण्यासाठी ६ ते ७ गावातील जनतेचा रोजच संपर्क येतो. तळोधी येथे शैक्षणिक सुविधेसाठी इंग्लिश मिडीयम तथा महाविद्यालय व नवोदय विद्यालय आहे. या ठिकाणी परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेण्यासाठी येतात, तळोधी या ठिकाणी राष्ट्रीय कृत बॅक , जिल्हा मध्यवर्ती बॅक, तसेच ग्रामीण बॅक असून आर्थिक व्यवहार करण्यासाठी सुद्धा परिसरातील जनता रोज ये जा करतात. या ठिकाणी मंडळ अधिकारी कार्यालय, तलाठी कार्यालय, पोस्ट ऑफिस, तसेच सेतू सुविधा केंद्र सुद्धा आहे. शासकीय कामकाजाची ऑनलाईन प्रक्रिया करण्यासाठी परिसरातील जनता मोठ्या संख्येने येतात. दुचाकी तथा चारचाकी वाहनांनी जाणारे याच मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात परंतु या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून दुचाकीस्वार पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता पावसाळा सुरु झालेला आहे. आणि पावसामुळे रस्ता आणखी खराब होणार आहे तरी संबंधित विभागाने रस्त्याची पाहणी करून रस्त्याचे काम सुरु करण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे.



















