भंडारा(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३०.०७.२०२२
भंडारा- सेवानिवृत्त कनिष्ठ लिपिकाच्या अर्जित रजा रोखीकरणासाठी साडेतीन हजार रुपयांची लाच घेताना येथील माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन पथकाच्या अधीक्षक प्रतिभा मेश्राम यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई सायंकाळी भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या कार्यालयातच केली. तक्रारदार हा कनिष्ठ लिपिक असून तो सेवानिवृत्त झाला आहे. त्याच्या अर्जित रजा रोखीकरणासाठी त्याने भंडारा येथील शिक्षण विभागाच्या वेतन पथकाकडे अर्ज सादर केला. मात्र त्याचे रजा रोखीकरण झाले नाही. प्रकरण मंजूर करून कोषागार कार्यालयात पाठविण्यासाठी वेतन पथक अधीक्षक प्रतिभा मेश्राम यांनी साडेतीन हजार रुपयांची मागणी केली. मात्र तक्रारदाराने याबाबत भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावरून सायंकाळी वेतन पथक कार्यालयातच सापळा रचण्यात आला आणि सेवानिवृत्त कनिष्ठ लिपिकाकडून लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस उपअधीक्षक महेश चाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के, अमित डहारे, सहायक फौजदार संजय कुरंजकर, हवालदार मिथुन चांदेवार, अंकुश गाढवे, चेतन पोटे, विष्णू वरठी, कृणाल कडव, राजकुमार लेंडे, अभिलाषा गजभिये, दिनेश धार्मिक यांनी केली.



















