महाराष्ट्र शासनाच्या समरसता लोककला संमेलनात तेल्हारा तालुक्यातील कलावंतांचा गौरव
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, स्वप्नील इंगळे
दि.०२.०७.२०२६
तेल्हारा – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय व समरसता साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘समरसता लोककला संमेलन २०२६’ अंतर्गत दि. २८ जून २०२६ रोजी बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर, पुणे* येथे भव्य एकदिवसीय कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या संमेलनात लोककला दिंडी, दुर्मिळ लोकवाद्य प्रदर्शन, कवी संमेलन, पारंपरिक लोककला दर्शन, चर्चासत्र तसेच विविध लोककला व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील लोककलावंतांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.
यावेळी मराठी चित्रपट ‘गाढवाचे लग्न’ या चित्रपटातील अभिनेत्री रजनी पाचंगे (गंगू) यांच्या हस्ते समता कला सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था, गाडेगाव येथील कलावंतांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
सन्मानित कलावंतांमध्ये शाहीर रवींद्र विरघट (अध्यक्ष), ग्रंथमित्र रामेश्वर पोहेकर, हार्मोनियम वादक संघपाल दामोदर, ढोलक वादक राहुल गवई, प्रबोधनकार सदानंद मोरे, भीमराव तायडे, संतोष भाऊ दामोदर, शीलरत्न अंदुरकर, उत्तम गवई आणि प्रकाश अवचार यांचा समावेश होता.
या सन्मानामुळे तेल्हारा तालुक्यातील लोककलावंतांचा गौरव झाला असून, त्यांच्या कला क्षेत्रातील योगदानाची शासनस्तरावर दखल घेतल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. कार्यक्रमाला राज्यभरातील अनेक नामवंत लोककलावंत, साहित्यिक व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















