मुंबईसह उपनगरांना मुसळधार पावसाचा तडाखा; सखल भाग जलमय, वाहतूक विस्कळीत
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, अमोल अभंग
दि.०२.०७.२०२६
मुंबईत – मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली असून जनजीवनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते वाहतूक संथ गतीने सुरू आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
अंधेरी भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तो काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. तसेच कलानगर, वडाळा आणि जेव्हीएलआर (JVLR) परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सांताक्रूझ, अंधेरी, दादर, कुर्ला, माटुंगा यांसारख्या सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांनी आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नये तसेच हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



















