तेल्हारा शहराच्या सुपुत्राची गगनभरारी: भारतीय वायुसेनेचे अधिकारी वैभव खारोडे यांची ‘विंग कमांडर’पदी पदोन्नती!
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, संघर्ष बोदडे
दि.१०.०७.२०२६
अकोला- तेल्हारा शहराचे सुपुत्र आणि आपल्या कर्तृत्वाने देशाच्या संरक्षणात मोलाचे योगदान देणारे भारतीय वायुसेनेचे (IAF) धडाडीचे अधिकारी वैभव प्रदीपराव खारोडे यांना वायुसेनेत ‘विंग कमांडर’ या अत्यंत जबाबदारीच्या आणि वरिष्ठ पदावर पदोन्नती (बढती) मिळाली आहे. त्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे संपूर्ण तेल्हारा शहर आणि अकोला जिल्हा परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.देशभरातून अवघ्या २३ उमेदवारांमध्ये पटकावले होते स्थानवैभव खारोडे यांची सन २०१२ मध्ये भारतीय वायुसेनेत ‘पायलट’ म्हणून अधिकृत नियुक्ती झाली होती. अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि खडतर असलेल्या या निवडीमध्ये त्या वर्षी देशभरातून केवळ २३ उमेदवारांची निवड करण्यात आली होती. त्यात वैभव यांनी आपले स्थान निश्चित करून तेल्हारा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला होता.कठोर परिश्रम आणि निष्ठा ठरली यशाची गुरुकिल्लीवायुसेनेतील प्रवेशानंतर त्यांनी आपले कठोर प्रशिक्षण, उत्कृष्ट कामगिरी आणि अजोड कर्तव्यनिष्ठेच्या बळावर यशस्वी कारकीर्द घडवली आहे. विविध स्तरांवर देशसेवा बजावल्यानंतर आता त्यांना विंग कमांडर या अत्यंत महत्त्वाच्या पदाची धुरा सोपवण्यात आली आहे.तरुणांसाठी प्रेरणादायी आदर्शविंग कमांडर वैभव खारोडे यांचे हे यश आजच्या तरुण पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणारे आहे. त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल अकोला जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिकांनी त्यांचे जाहीर अभिनंदन केले असून पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.



















