शिरूर-हवेलीच्या वीज प्रश्नांना गती; आमदार माऊली आबा कटके यांच्या पाठपुराव्याला यश…
वाघोलीसाठी ९१ कोटींच्या उच्च दाब केंद्राचा प्रस्ताव, रांजणगाव MIDC व सणसवाडी प्रकल्पांनाही गती
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, शशिकांत माने
दि. १७.०७.२०२६
पुणे – शिरूर-हवेली मतदारसंघातील वीज समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार माऊली आबा कटके यांनी महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी (महापारेषण)चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विक्रम कुमार (भा.प्र.से.) यांची मुंबई येथील प्रकाशगंगा कार्यालयात भेट घेतली. या बैठकीत मतदारसंघातील विविध प्रलंबित वीज प्रकल्पांबाबत सकारात्मक चर्चा झाली.
बैठकीत वाघोली पंचक्रोशीसाठी ९१ कोटी रुपयांच्या उच्च दाब केंद्राच्या (High Voltage Substation) प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाघोली व परिसरातील नागरिकांना अधिक सक्षम आणि अखंडित वीजपुरवठा होण्यास मदत होणार आहे.
तसेच रांजणगाव एमआयडीसी परिसरातील उद्योगांना भेडसावणारी वीज समस्या दूर करण्यासाठी ५० एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर तातडीने कार्यान्वित करण्याचे आश्वासन देण्यात आले.
याशिवाय सणसवाडी येथील उच्च दाब केंद्राचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबतही बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आला.
आमदार माऊली आबा कटके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मतदारसंघातील वीज पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळणार असून, नागरिकांसह औद्योगिक क्षेत्रालाही याचा मोठा लाभ होणार आहे.



















