खटकाळीच्या डोहात दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; निष्पक्ष चौकशीची मागणी
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि.२५.०८.२०२६
अकोट- तालुक्यातील खटकाळी येथील डोहात दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गिरिधर चंद्रशेखर दाभाडे (वय १६) आणि कृष्णा चंद्रशेखर झामरे (वय १६) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे असल्याचे समोर आले आहे. दोघेही अकोट येथील शाळेत शिक्षण घेत असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही विद्यार्थी खटकाळी परिसरात गेले असताना डोहातील पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, घटनेबाबत काही प्रश्न उपस्थित होत असून, दोन्ही विद्यार्थी नेमके कोणासोबत खटकाळी येथे गेले होते, त्यांच्यासोबत आणखी कोणी होते का, तसेच घटनेची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, याबाबत सखोल तपासाची मागणी होत आहे.
अपघात की अन्य काही कारण?
घटना नेमकी अपघाती आहे की यामागे अन्य काही कारण आहे, याबाबत अधिकृत तपासातूनच सत्य स्पष्ट होणे अपेक्षित आहे. त्यामुळे मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी संबंधित प्रशासन व पोलिसांनी सर्व बाजू तपासून निष्पक्ष आणि सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
या घटनेची अधिकृत माहिती आणि तपासातील निष्कर्ष समोर आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.



















