पळशी झाशी, चांगेफळ खुर्द येथे घरफोड्या; ७ लाख १५ हजारांचा मुद्देमाल लंपास
वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीती; तामगाव पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि.२५.०८.२०२६
संग्रामपूर- तालुक्यातील पळशी झाशी आणि चांगेफळ खुर्द येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य करत घरफोड्या केल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही घटनांमध्ये सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि पितळेच्या वस्तू असा एकूण ७ लाख १५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. सलग घडलेल्या या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पळशी झाशी येथे ६ लाख ४४ हजार ८०० रुपयांची चोरी
पळशी झाशी येथे १९ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेपासून २० ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने कैलास श्रीकृष्ण मारोडे यांच्या घराच्या दरवाजाची कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील दोन लोखंडी अलमारींचे लॉकर तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली.
चोरी गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांचे वजन अंदाजे १९१ ग्रॅम असून त्यांची किंमत ५ लाख ३४ हजार ८०० रुपये आहे. तसेच सुमारे २५० ग्रॅम चांदीचे दागिने, नाणी व इतर वस्तू असा १० हजार रुपयांचा मुद्देमाल, तसेच १ लाख रुपये रोख, असा एकूण ६ लाख ४४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला.
या प्रकरणी कैलास मारोडे यांच्या फिर्यादीवरून तामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २८२/२०२६, कलम ३३१(४), ३०५(अ) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ करीत आहेत.
चांगेफळ खुर्द येथे सहाय्यक सरकारी अभियोक्त्याच्या घरात चोरी
दरम्यान, चांगेफळ खुर्द येथे सहाय्यक सरकारी अभियोक्ता शिवशंकर नारायण थेरोकार यांच्या बंद घरातही अज्ञात चोरट्याने घरफोडी केली. ही घटना १९ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजेपासून २० ऑगस्ट रोजी दुपारी २.१५ वाजेपर्यंतच्या कालावधीत घडली.
चोरट्याने घराच्या दरवाजाची कडी-कोंडा तसेच लोखंडी कपाटाचा कोंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील ५० हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने, २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि १ हजार रुपये किमतीच्या चार पितळेच्या समई, असा एकूण ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
या प्रकरणी थेरोकार यांच्या फिर्यादीवरून तामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २८४/२०२६, कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) बीएनएस अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोपटे करीत आहेत.
पोलिसांच्या गस्तीवर नागरिकांचे लक्ष
संग्रामपूर तालुक्यात अल्पावधीत दोन ठिकाणी घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. बंद घरे हेरून चोरी करणाऱ्या टोळीचा तातडीने शोध घेऊन कारवाई करावी, तसेच ग्रामीण भागात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
🔷 घरफोड्यांच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांसमोर आव्हान
पळशी झाशी आणि चांगेफळ खुर्द येथील घरफोड्यांमध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याने परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. अज्ञात चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रभावी गस्त आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



















