निरोड येथील तलाठी कार्यालयाच्या जागा बदला
ग्रामस्थांनी दिले बांधकाम विभागाला निवेदन
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि. ०३.०९.२०२६
संग्रामपूर- निरोड येथील तलाठी कार्यालयासाठी प्रस्तावित जागा बदलविण्यात यावी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना ३१ ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात आले आहे.
सदर दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, निरोड गावात तलाठी कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून सध्या संबंधित ठिकाणी खोदकाम करण्यात येत आहे. मात्र, सन २०२४-२५ मध्ये महापूर आल्यामुळे तलाठी कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. भविष्यात पुन्हा पूरस्थिती निर्माण झाल्यास शासकीय निधीतून बांधण्यात येणाऱ्या इमारतीचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने तलाठी कार्यालयाची जागा बदलण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात कार्यालयासाठी नवीन सुरक्षित जागा निश्चित करून त्याठिकाणी बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. तसेच जागा बदलण्याबाबत प्रशासनाने वेळीच निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
याबाबत समस्त गावकरी मंडळी, निरोड यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनाच्या प्रतीलीपी तहसीलदार, संग्रामपूर तसेच ग्रामपंचायत निरोडच्या सरपंच/सचिवांना देण्यात आल्या आहेत.
ग्रामस्थांच्या मागणीवर प्रशासन आता काय निर्णय घेते, याकडे निरोडवासीयांचे लक्ष लागले आहे.



















