एकलारा परिसरात बिबट्याची दहशत; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
🔷रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळण्याचे आवाहन; वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि.०२.०९.२०२६
संग्रामपूर- एकलारा-बानोदा परिसरातील शेतशिवारात बिबट्याचा वावर आढळून आल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी रात्री शेतात बिबट्या आढळून आल्याची माहिती समोर आली असून, काही शेतकऱ्यांनी त्याचे छायाचित्र व व्हिडिओ मोबाईलमध्ये टिपले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, बिबट्याच्या हालचालींमुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जाणे धोकादायक ठरत आहे. शेतीची कामे, पिकांना पाणी देणे तसेच जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
पिकांमुळे बिबट्याला लपण्यासाठी पोषक वातावरण
परिसरात हळद व सोयाबीनची पिके मोठ्या प्रमाणात असून, दाट पिकांमध्ये बिबट्याला लपण्यासाठी सुरक्षित जागा मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे वनविभागाने परिसरात गस्त वाढवून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
वनविभागाचे नागरिकांना आवाहन
सायंकाळी ६ ते सकाळी ६ या वेळेत नागरिकांनी एकट्याने शेतात जाऊ नये. लहान मुले व वृद्धांना विनाकारण घराबाहेर पाठवू नये. जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावे. बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला पकडण्याचा प्रयत्न न करता तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वनविभागाने तातडीने पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी एकलारा परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.



















